"एअर स्ट्राईकचा बदला घेऊ"; १९ जणांच्या मृत्यूमुळे अफगाणिस्तान आक्रमक, पाकिस्तानला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 08:35 IST2026-02-22T08:34:17+5:302026-02-22T08:35:23+5:30
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत.

फोटो - Reuters
अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने आम्ही पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचं मूल्यमापन करत असल्याचं म्हणत प्रतिहल्ल्याचा इशाराही दिला आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एका निवेदनात पाकिस्तानवर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आणि निष्पाप नागरिकांवर हल्ला केल्याचा आरोप केला.
"पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या भूभागात घुसखोरी केली आहे. काल रात्री त्यांनी नंगरहार आणि पक्तिका प्रांतात आमच्या नागरिकांवर बॉम्ब टाकले, ज्यामध्ये महिला आणि मुलांसह अनेक लोक मारले गेले आणि जखमी झाले. पाकिस्तानी जनरल अशा गुन्ह्यांद्वारे स्वतःच्या देशातील सुरक्षा त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत" असं म्हटलं आहे. पाकिस्तानी एअर स्ट्राईकमध्ये एकाच कुटुंबातील १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अफगाण तालिबानच्या सूत्रांनी सांगितलं की, अधिकारी या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या व्याप्तीची चौकशी करत आहेत. अद्याप अफगाण तालिबानकडून कोणत्याही तात्काळ प्रतिक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, नेतृत्वाने प्रतिहल्ल्याचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले आहेत. सूत्रांनी तालिबानच्या हवाल्याने म्हटलं आहे की, "पाकिस्तानने अफगाण हवाई क्षेत्राचे उल्लंघन केलं आहे आणि अफगाणिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. याचा बदला घेऊ. आम्ही योग्य वेळी प्रतिहल्ला करू."
अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू
पक्तिका आणि नंगरहारमधील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर, तालिबान प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी काबुल आणि कंदहारमध्ये तातडीच्या बैठका बोलावल्या आहेत. सूत्रांनी सांगितलं की, "पाकिस्तानी हल्ल्यांवर आताच निश्चितपणे काहीही सांगणं घाईचं ठरेल, परंतु काबुल नक्कीच प्रत्युत्तर देईल." यावरून असे संकेत मिळत आहेत की, अंतर्गत विचारविनिमयानंतर अफगाण तालिबानकडून पाकिस्तानी हल्ल्यांविरुद्ध औपचारिक प्रतिक्रिया दिली जाऊ शकते.
दुसरीकडे, पाकिस्तानने दावा केला आहे की सीमा ओलांडून केलेल्या एअर स्ट्राईकचा उद्देश दहशतवादी यंत्रणांना लक्ष्य करणं हा होता. पाकिस्तानी सैन्याने म्हटलं आहे की, अफगाणिस्तानच्या पक्तिका, पक्तिया, नंगरहार आणि खोस्त प्रांतात केलेल्या अचूक हल्ल्यांमध्ये दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले आहेत. पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या हद्दीत ड्युरंड लाईन (अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा) जवळ अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला.