नोटांनी भरलेल्या विमानाचा भीषण अपघात, रस्त्यावरील वाहनांनाही धडकले; १५ जणांचा मृत्यू अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 08:51 IST2026-02-28T08:46:09+5:302026-02-28T08:51:32+5:30
घटनास्थळी असलेल्या लोकांनी या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नोटांनी भरलेल्या विमानाचा भीषण अपघात, रस्त्यावरील वाहनांनाही धडकले; १५ जणांचा मृत्यू अन्...
दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हिया येथे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. राजधानी ला पाजजवळील एल अल्टो शहरात बोलिव्हिया एअरफोर्सचं हरक्यूलिस सी १३० या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, ही दुर्घटना संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली. हे विमान लँडिंगवेळी रनवेवरून घसरले आणि एअरपोर्टच्या सीमारेषेची जाळी तोडून थेट रस्त्यावर जाऊन पडले. या विमानाने अनेक वाहनांनाही धडक दिली. ही टक्कर इतकी भयानक होती की त्यात अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या दुर्घटनेतील मृत हे विमानातले आहेत की एअरपोर्टजवळील रस्त्यावर जिथे विमानाने वाहनांना धडक दिली त्यातील आहेत का हे अजून स्पष्ट नाही.
🚨 BREAKING NEWS 🚨
— Huzaifa Shafqat (@HuzaifaJanjua11) February 28, 2026
In a tragic incident, Military cargo plane crashes in Bolivia leaving 11 people dead pic.twitter.com/SbbAupWzSh
रस्त्यावर विखुरल्या नोटा
विशेष म्हणजे हे विमान देशाच्या विविध भागात नवीन नोटा घेऊन जात होते. या अपघातामुळे नोटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. घटनास्थळी असलेल्या लोकांनी या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लष्करी विमानाने यापूर्वी सांताक्रूझ शहरातून उड्डाण केले होते आणि धावपट्टीवरून घसरून जवळच्या रस्त्यावर उतरल्यानंतर एल अल्टो येथे अपघात झाला असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, अपघातग्रस्त विमान देशाच्या अंतर्गत भागात चलन घेऊन जात होते असं बोलिव्हियाच्या संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत स्थानिक वृत्तपत्रांनी माहिती दिली आहे. त्याशिवाय अपघातानंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे तसेच अपघातग्रस्त विमान आमच्या ताफ्याचा भाग नव्हते असं राष्ट्रीय विमान कंपनी बोलिव्हियाना डी एव्हिएसिओनने एका निवेदनात म्हटले आहे.