प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 13:49 IST2025-09-30T13:49:27+5:302025-09-30T13:49:46+5:30
पत्नी अन् मेहुणीच्या मुलीला मारून केले होते गंभीर जखमी

प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : प्लॉट घेण्यासाठी पैसे मागण्यावरून झालेल्या वादातून जावयाने बाजेच्या ठाव्याने सासूच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केला. पत्नी आणि मेहुणीची मुलगी यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणात सासूचा खून करणाऱ्या जावयास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आखाडा बाळापूर येथील सिद्धार्थनगर येथे राहणारा आरोपी अजय रमेश सोनवणे हा १६ एप्रिल २०२३ रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या सासुरवाडीत गेला होता. या ठिकाणी प्लॉट घेण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून सासूसोबत वादावादी केली. यावेळी झालेल्या वादात रागाच्या भरात त्याने बाजेच्या लाकडी ठाव्याने सासू लताबाई खिल्लारे हिच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून तिचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला सोडविणारी त्याची पत्नी अर्चना हिच्या डोक्यात मारून तिलाही गंभीर जखमी केले. मेहुणीची मुलगी समीक्षा हिच्याही हातावर बाजेच्या ठाव्याने मारून जखमी केले होते. त्यानंतर, आरोपी अजय सोनवणे नांदेडच्या दिशेने पळून गेला.
ही घटना समजताच, बाळापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व पथकाने पाठलाग करून वारंगाजवळ आरोपीला अटक केली. त्यानंतर, संपूर्ण तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी केला. या प्रकरणात आरोपी अटकेत असतानाच आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले व अंतिम युक्तिवाद केला. फिर्यादी, दोन्ही जखमी साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ज्योती संजय पंडित यांच्यासह डॉ. डोणे आणि तपासीक अंमलदार शिवाजी बोंडले यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सरोज एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच ४० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास नऊ महिन्यांचा सश्रम करावास, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांना सहायक सरकारी वकील एस. डी. कुटे, सविता देशमुख यांनी सहकार्य केले.