८-१० ग्लास की जास्त...वजनानुसार आपण रोज किती पाणी प्यायला हवं? पाहा काय आहे याचा सोपा फॉर्म्यूला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:33 IST2026-04-28T11:33:07+5:302026-04-28T11:33:43+5:30
Water Drinking Tips : आपण नेहमीच ऐकलं असेल की, दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्यास सांगितलं जातं. पण मॉडर्न सायन्सचा नियम वेगळा आहे.

८-१० ग्लास की जास्त...वजनानुसार आपण रोज किती पाणी प्यायला हवं? पाहा काय आहे याचा सोपा फॉर्म्यूला
Water Drinking Tips : उन्हाळा दरवर्षीच येतो आणि तापमानही बरंच असतं. पण कधी नव्हे तो यावेळी सूर्य फार जास्त तापतोय. म्हणजे देशातील कितीतरी भागांमध्ये तापमान ४२-४५ च्या वर गेलंय. अर्थातच गरमीमुळे हाल बेहाल झाले आहेत. लोकांची तब्येत बिघडू लागली आहे. अशात सगळेच हेल्थ एक्सपर्ट सतत लोकांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देताहेत. पण भरपूर पाणी म्हणजे किती? असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. आपण नेहमीच ऐकलं असेल की, दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्यास सांगितलं जातं. पण मॉडर्न सायन्सचा नियम वेगळा आहे. मुळात पाण्याची गरज प्रत्येक व्यक्तीचं शरीर, अॅक्टिविटी आणि त्यांच्या वजनानुसार वेगवेगळी असते.
सामान्यपणे जर आपण आपल्याला गरज आहे त्यापेक्षा कमी पाणी प्यायलो, तर थकवा येणे, चक्कर येणे अशा समस्या होतात. तर कशाचाही विचार न करता जास्त पाणी प्याल तर याने किडनीवर अधिक दबाव पडतो. अशात आपण किती पाणी प्यायला हवं, हे माहीत असणं फार महत्वाचं ठरतं.
वजनानुसार किती पाणी प्यायला हवं?
यूनिव्हर्सिटी ऑफ मिसूरीच्या रिपोर्टनुसार, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी किती पाणी प्यावं याचा काही एक फिक्स नियम नाही. हे सगळं आपल्या शरीरावर ठरतं. रिसर्चमध्ये एक सरळ आणि सोपा उपाय सांगण्यात आलाय. ज्यावरून आपण ठरवू शकता की, आपल्या शरीराला किती लीटर पाण्याची गरज आहे. उदाहरण द्यायचं तर जर आपलं वजन ६० किलो असेल तर त्याला ३० ने विभागलं तर उत्तर दोन येतं. म्हणजे आपल्याला दिवसभरात कमीत कमी २ लीटर पाणी प्यावं लागेल. तेच जर कुणीचं वजन ९० किलो असेल तर त्यांना कमीत कमी ३ लीटर पाण्याची गरज असेल.
उन्हाळ्यात वाढते पाण्याची गरज
मायो क्लीनिकनुसार, या फॉर्म्यूल्याने एक बेसिक गरज लक्षात येते. पण जेव्हा तापमान ४० डिग्रीच्या वर जातं, तेव्हा गणित थोडं बदलतं. मेयो क्लीनिकच्या रिसर्चनुसार, जर आपण उन्हात बाहेर निघत असाल किंवा व्यायाम करत असाल तर घामाद्वारे बाहेर पडणारे इलेक्ट्रोलाइट्स परत मिळवण्यासाठी दर तासाच्या अॅक्टिविटीवर साधारण ३५० मिली जास्त पाणी प्यावं लागेल. सोबतच जर आपण चहा-कॉफी जास्त पित असाल तर आपल्याला आणखी जास्त पाण्याची गरज पडू शकते. कारण जास्त कॅफीनमुळे शरीर डिहायड्रेट होतं.
तहान लागण्याची वाट बघू नका
जास्तीत जास्त लोक असंच करतात की, जेव्हा घसा कोरडा पडतो, तेव्हा पाणी पितात. म्हणजे लोक पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट बघत बसतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की, तहान लागणं या गोष्टीचा संकेत असतो की, आपलं शरीर आधीच १ ते २ टक्के डिहायटड्रेट झालंय. हे टाळण्यासाठी गरजेचं आहे की, थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी पित रहावं.