ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:20+5:30

जिल्हा ग्रीन झोनमध्ये असून कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. आठवडाभरापूर्वी तामीळनाडू येथील एक ट्रक चालक सामान सोडण्यासाठी गोंदिया येथे आला होता.

Samples of those who came in contact with the truck driver were negative | ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह

ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दिलासा : ३२ दिवसात नवीन रुग्णांची नोंद नाही, कोरोना उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तामीळनाडू येथील एक ट्रक चालक आठवडाभरापूर्वी गोंदिया येथे सामान सोडण्यासाठी आला होता. हा ट्रक चालक गोंदिया येथून तामीळनाडूला परत गेल्यानंतर त्याची तिथे आरोग्य तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना आयसोलेशन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला असून या सर्व १० जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा ग्रीन झोनमध्ये असून कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. आठवडाभरापूर्वी तामीळनाडू येथील एक ट्रक चालक सामान सोडण्यासाठी गोंदिया येथे आला होता. सामान सोडून तो तामीळनाडू येथे परत गेल्यानंतर त्याची तिथे तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर तेथील पोलीस अधीक्षकांनी ही माहिती गोंदिया पोलीस विभागाला दिली. ही माहिती प्राप्त होताच या ट्रक चालकाच्या गोंदिया येथे संपर्कात आलेल्या १० जणांना आरोग्य विभागाने जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल मंगळवारी (दि.१२) जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून या सर्व १० जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून आत्तापर्यंत एकूण ३३६ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३२८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात मागील ३२ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळेच जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग,पोलीस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.

आयसोलेशन कक्षात ६३ जण
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना आयसोलेशन कक्ष आणि शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल केले जाते. सध्या गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील ६३ जणांवर उपचार सुरू आहे. तर सहा क्वारंटाईन कक्षात ६० जण उपचार घेत आहेत. यात एम. एस. आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया १७, चांदोरी ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, उपकेंद्र बिरसी ७, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा २ आणि शासकीय आश्रमशाळा इळदा २८ असे एकूण ६० व्यक्तीं उपचार घेत आहे.
 

Web Title: Samples of those who came in contact with the truck driver were negative