मिळाले फक्त ५४ लाख

By Admin | Updated: March 27, 2016 01:52 IST2016-03-27T01:52:41+5:302016-03-27T01:52:41+5:30

स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेला शौचालय बांधकामाचा कार्यक्रम आता अडचणीत आला आहे.

Only 54 lakhs received | मिळाले फक्त ५४ लाख

मिळाले फक्त ५४ लाख

२.१६ कोटींची गरज : शौचालय बांधकाम अडचणीत
गोंदिया : स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेला शौचालय बांधकामाचा कार्यक्रम आता अडचणीत आला आहे. कारण शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेने दोन कोटी १६ लाख रूपयांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र फक्त ५४ लाख रूपयांचा निधी पालिकेला मिळाला असल्याने लाभार्थ्यांना अनुदान द्यावे तरी कसे हा प्रश्न विभागाला पडला आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे. याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे.
शहरांत राबविण्यात येणाऱ्या या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. यासाठी नगर पालिका क्षेत्रातील वैयक्तीक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शहरात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत पालिकेला ९४ लाख रूपयांचा निधी मिळाला होता. तो निधी अनुदान स्वरूपात वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे लाभार्थींना अनुदान देण्यासाठी पालिकेला आणखी निधीची गरज आहे.
यासाठी नगर परिषदेने शासनाकडे दोन कोटी १६ लाख रूपयांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून फक्त ५४ लाख रूपयांचा निधीच मिळाला आहे.
अशात शौचालयांचे बांधकाम सुरू असलेल्या लाभार्थ्यांना अनुदान द्यावे, की उर्वरीत लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम सुरू करण्यास सांगावे असा प्रश्न येथे विभागाला पडला आहे. (शहर प्रतिनिधी)

१५७१ अर्ज शिल्लक
शौचालय बांधकामांतर्गत पात्र लाभार्थ्याला केंद्र शासनाकडून चारहजार रूये व राज्य शासनाकडून आठ हजार रूपये असे एकूण १२ हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. त्यात नगर परिषदेला तीन हजार रूपये वैयक्तीक शौचालयांसाठी तर २५ हजार रूपये सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी द्यावयाचे आहेत. त्यानुसार पालिकेने १२०० लाभार्थींना पहिल्या टप्याचे अनुदान वाटप केले आहे. आता या ५४ लाखांतून दुसरा टप्पा दिला जाणार असल्याची माहिती आहे. याशिवाय आणखी १५७१ अर्ज शिल्लक असून निधी आल्यावरच त्यांना शौचालय बांधकाम सुरू करता येणार असल्याचे दिसते.

Web Title: Only 54 lakhs received