जर फोन तुमच्यापासून थोडा वेळ जरी लांब गेला आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू लागलं, तर ही केवळ एक सवय नाही. हे एक लक्षण आहे की, स्क्रीन तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर गंभीर परिणाम करत आहे. एका रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये भारतातील लोकांनी स्मार्टफोनवर एकूण १.१ ट्रिलियन तास घालवले आहेत, म्हणजेच सरासरी प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे ५ तास स्क्रीनसमोर असते. यामुळे तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे ते जाणून घेऊया.
वेळेआधीच वृद्धत्व येण्याचं कारण
स्क्रीनचा हा वाढता वापर शरीरामध्ये हळूहळू अशी प्रक्रिया सुरू करतो, जी वेळेआधीच वृद्धत्व येण्यास कारणीभूत ठरू शकते. याचा सर्वात पहिला परिणाम तुमच्या झोपेवर होतो. रात्री फोन वापरल्यामुळे त्यातून बाहेर पडणारा 'ब्लू लाईट' शरीरातील 'मेलाटोनिन' हार्मोनला दाबतो, जे शांत झोपेसाठी अत्यंत आवश्यक असतं. 'एनपीजे डिजिटल हेल्थ'मध्ये प्रसिद्ध झालेलं संशोधन सांगतं की, रात्री जितका जास्त वेळ स्क्रीनचा वापर होईल, तितकी झोपेची गुणवत्ता खराब होईल.
विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम
झोपेची कमतरता केवळ थकव्यापुरती मर्यादित राहत नाही, तर याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. संशोधनात असं दिसून आलं आहे की, यामुळे मेंदूच्या स्मरणशक्तीशी संबंधित रचना कमकुवत होऊ लागतात आणि विचार करण्याची क्षमता प्रभावित होते. 'द लॅन्सेट कमिशन' (२०२४) च्या रिपोर्टमध्ये तर असंही म्हटलं आहे की, झोपेच्या समस्या 'डिमेंशिया'च्या मोठ्या कारणांपैकी एक ठरत आहेत.
हा परिणाम केवळ मेंदूवरच थांबत नाही. 'फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी' (२०२३) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जास्त स्क्रीन टाइम आणि खराब झोपेचा थेट परिणाम आपल्या 'गट मायक्रोबायोम'वर (पोटातील आरोग्य) होतो. म्हणजेच पोटातील चांगल्या बॅक्टेरियांचं संतुलन बिघडू लागते. याच कारणामुळे स्क्रीनच्या व्यसनामुळे चिंता (Anxiety), लो मूड आणि तणाव वाढू लागतो.
तज्ज्ञ काय म्हणतात?
डॉ. एरन हार्टमॅन सांगतात की, झोप, तणाव आणि पोटाचं आरोग्य हे तिन्ही एकमेकांशी जोडलेलं आहेत. यापैकी एकही गोष्ट बिघडली तर इतर दोन गोष्टींवर आपोआप परिणाम होतो. याशिवाय 'जेरोसायन्स' (२०२४) मधील अभ्यासानुसार, रात्री कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने शरीरात सूज वाढते, जी मेंदूपर्यंत पोहोचून 'न्यूरोइन्फ्लेमेशन' निर्माण करू शकते. हीच प्रक्रिया वेगाने वाढणाऱ्या वयाचं कारण ठरतं. डॉ. जॉन ला पुमा यांनी याला "डिजिटल ओबेसिटी" असं नाव दिलं आहे. जिथे स्क्रीनचे व्यसन शरीर आणि मेंदू या दोघांचंही हळूहळू नुकसान करतं. फोनवर येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशनसोबत मिळणारे 'डोपामाइन' मेंदूवर तसाच परिणाम करतं, जसा एखाद्या अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे होतो.
