सेफ अन् सेफच्या सस्पेन्समुळे वाढली अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:09+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दमदार उमेदवार देऊन विरोधकांना शह देण्याची रणनीती काँग्रेस राष्ट्रवादीकडून आखली जात आहे. गोंदिया विधानसभेचे विद्यमान आ.गोपालदास अग्रवाल यांनी पक्षांतर केल्यास त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय शिवणकर यांना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.तर काँग्रेसकडून अमर वऱ्हाडे, विजय बहेकार या दोन नावांशिवाय तिसऱ्या नावाची चर्चा नाही.

Increased discomfort due to the suspension of Safe and Safe | सेफ अन् सेफच्या सस्पेन्समुळे वाढली अस्वस्थता

सेफ अन् सेफच्या सस्पेन्समुळे वाढली अस्वस्थता

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम : घटस्थापनेनंतरच होणार चित्र स्पष्ट , तिकिटांसाठी नवख्यांची वारी, उमेदवार कोण हीच चर्चा

अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीकरीता २१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. मात्र अद्यापही एकाही राजकीय पक्षांने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. तर भाजपकडून विद्यमान आमदारांपैकी काहींना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे सीटींग गेटींगचे सूत्र कायम राहणार नसल्याने विद्यमान आमदारांमध्ये सुध्दा तिकीट मिळण्याबाबत अस्वस्थता कायम आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघात सेफ अन सेफचा सस्पेन्स कायम आहे.
जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ असून चारपैकी तीन मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे.तर एकमेव गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या चारही मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळाले.त्यामुळे भाजप आमदार विधानसभा निवडणुकीपुर्वीच्या चाचणी परीक्षेत उर्तीण झाले. त्यामुळे त्यांचा रिर्पोटकार्ड सुध्दा सुधारल्याने विद्यमान आमदार उमेदवारीबाबत निश्चिंत होते. मात्र पक्ष श्रेष्ठींनी राज्यातील विद्यमान आमदारांपैकी ३० टक्के आमदारांना सीटींग गेटींगचे सूत्र न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांमध्ये काहीशी अस्वस्थता पाहयला मिळत आहे.त्यातच चारही मतदारसंघातून भाजपतर्फे काही नवीन नावांची चर्चा सुरू असून मागील काही दिवसांपासून त्यांची मतदारसंघात सक्रियता सुध्दा वाढली आहे.तिरोडा मतदारसंघातून आ. विजय रहांगडाले यांच्यासह गुड्डू बोपचे,प्रा.धमेंद्र तुरकर यांची नावे चर्चेत आहे. तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून आ. राजकुमार बडोले यांच्यासह जीवन जगणीत,पोमेश रामटेके,व्यकंट चौधरी यांची नावे चर्चेत आहेत.आमगाव मतदारसंघातून आ.संजय पुराम यांच्याशिवाय माजी सभापती देवराज वडगाये, शंकर मडावी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपकडून देवराज वडगाये यांच्या नावाची चर्चा आहे.गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विनोद अग्रवाल यांचे नाव अग्रक्रमावर असून डॉ. प्रशांत कटरे यांचे नाव सुध्दा चर्चेत आहे. मात्र युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचे विद्यमान आ. गोपालदास अग्रवाल यांच्या पक्षांतराची चर्चा असल्याने या मतदारसंघाचे अंतीम चित्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सेफ अन सेफच्या सस्पेन्समुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघामध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा सावध पावित्रा
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दमदार उमेदवार देऊन विरोधकांना शह देण्याची रणनीती काँग्रेस राष्ट्रवादीकडून आखली जात आहे. गोंदिया विधानसभेचे विद्यमान आ.गोपालदास अग्रवाल यांनी पक्षांतर केल्यास त्यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय शिवणकर यांना रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.तर काँग्रेसकडून अमर वऱ्हाडे, विजय बहेकार या दोन नावांशिवाय तिसऱ्या नावाची चर्चा नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव येथील जागेवर दावा केला आहे. तिरोडा मतदारसंघातून दिलीप बन्सोड,पंचम बिसेन यांच्या तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून मनोहर चंद्रिकापूरे यांच्या एकमेव नावाची राष्ट्रवादी काँग्रेसकडून चर्चा आहे. काँग्रेसकडून अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून उषा शहारे,राजेश नंदागवळी,रत्नदीप दहिवले यांच्या नावांची चर्चा आहे.त्यांच्या दिल्ली येथे मुलाखती झाल्याची माहिती आहे.आमगाव मतदारसंघातून माजी आ.रामरतन राऊत, सहषराम कोरोटे यांचे नाव चर्चेत आहे.

मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा सल्ला
काँग्रेसचे आ.गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरुन गोंदिया शहर आणि जिल्ह्यातील काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच यावरुन कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे सांगितले. मात्र त्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.

घटस्थापनेनंतर होणार लढतीचे चित्र स्पष्ट
सर्वच राजकीय पक्षांनी घटस्थापनेनंतर विधानसभा निहाय उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे कोणत्या मतदारसंघात दुहेरी की तिहेरी लढत होणार याचे चित्र यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांनी वेट अ‍ॅन्ड वॉचचे धोरण स्विकारले आहे.
भाजपमध्ये धूसफूस कायम
गोंदिया विधानसभा क्षेत्राबाबत पक्षाने अद्यापही स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. तर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. उघडपणे कुणीही समोर येऊन बोलत नसले तरी मात्र त्यांच्यातील असंतोष देखील लपून राहिलेला नाही. भाजपमधील या अंतर्गत असंतोषाचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Increased discomfort due to the suspension of Safe and Safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.