घृणास्पद

By Admin | Updated: January 4, 2015 23:13 IST2015-01-04T23:13:26+5:302015-01-04T23:13:26+5:30

वंशाच्या दिव्याच्या लालसेपोटी गर्भातच मुलींचा जीव घेण्याचे, जन्मानंतर तिला फेकून देण्याचे सत्र थांबलेले नाही. रविवारी सकाळी सिव्हील लाईंन्स परिसरातील नागराज चौकाजवळील

Hateful | घृणास्पद

घृणास्पद

नवजात मुलीला फेकले
गोंदिया : वंशाच्या दिव्याच्या लालसेपोटी गर्भातच मुलींचा जीव घेण्याचे, जन्मानंतर तिला फेकून देण्याचे सत्र थांबलेले नाही. रविवारी सकाळी सिव्हील लाईंन्स परिसरातील नागराज चौकाजवळील मैदानात एक नवजात कन्या बेवारस स्थितीत आढळून आली. कुत्र्यांनी या चिमुकलीचे लचके तोडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे. मृत्युशी झुंज देत असलेल्या या चिमुकलिला परिसरातील काही तरूणांनी उपचारार्थ बाई गंगाबाई रूग्णालयात दाखल केले. दुपारनंतर तिला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकारावर शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
आज ईदचा दिवस असल्याने परिसरात सकाळपासूनच वर्दळ होती. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील डॉ. जयपुरिया यांच्या नर्सिंग होम जवळील मैदानात सकाळी ७ वाजता दरम्यान नवजात बाळ बेवारस स्थितीत पडून असल्याचे काही नागरिकांना दिसून आले. ही बातमी कळताच घटनास्थळी एकच गर्दी जमली. नागरिकांनी अर्भकाला उचलले असता ते कन्या रत्न असल्याचे व बेवारस कुत्र्यांनी तिच्या डोळ्याला, मांडीला चावा घेतला असल्याचे दिसून आले. परिसरातील रहिवासी इरशाद अहमद कुरेशी, राकेश बबनराव बेलगे, सय्यद असलम अली, परवेज शेख या तरूणांनी लगेच तिला बीजीडब्ल्यू रूग्णालयात नेले. रूग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉ. विजय माळी यांनी प्रकृती बघून तिला अतिदक्षता विभागात दाखल केले. विशेष म्हणजे उघडयावर थंडीत फेकण्यात आल्याने चिमुकलीचे शरीर थंडगार झाले होते. शिवाय जखमांमधून रक्तस्त्रावही सुरू होता. डॉक्टरांनी यावर लागलीच उपचार सुरू केले. ऊब देण्यासाठी तिला ‘इन्क्युबेटर’मध्ये ठेवले. दुपारनंतर तिला उपचारार्थ नागपूरला हलविण्यात आले. (प्रतिनिधी)
मुलीच्या सलामतीसाठी अल्लाहकडे दुआ
जन्माला मुलगी आल्याने तिचा स्वीकार न करण्याच्या उद्देशातून किंवा अनैतीक संबंधातून घडलेला हा प्रकार असावा असा कयास लावला जात आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने शहरातवासीयांत एकीकडे रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र मृत्यूच्या दारात उभ्या त्या चिमुकलीसाठी अल्लाहकडे मागणी करणार असल्याचे तिला रूग्णालयात नेणाऱ्या मुस्लीम बांधवांनी बोलून दाखविले.
शहर पोलिसांत तक्रार
या प्रकाराबाबत पोलिसांत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी राकेश बबनराव बेलगे (३७,रा.नागराज चौक) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३१७ अंतर्गत प्रकरणाची नोंद केली आहे.

Web Title: Hateful