गोंदिया : केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी परीक्षेचा निकाल चार दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. यात जिल्ह्यातील आदिवास बहुल सालेकसा तालुक्यातील सचिन बिसेन आणि तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील डॉ. पंकज पटले हे दोन तरुण उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाने समस्त जिल्हावासीयांची मान उंचावली. शिवाय या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व स्वअध्ययनावर भर देत यश संपादन केले. हे जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, तर गेल्या तीन-चार वर्षापासून स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचा टक्का वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील व आदिवासीबहुल जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी फारसे अनुकूल वातावरण पूर्वी नव्हते. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसची संख्याही बोटावर मोजण्याएवढी आहे. सात-आठ वर्षांपूर्वी जिल्ह्यातून एखादा विद्यार्थी युपीएससी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत होता. पण, गेल्या तीन-चार वर्षात हे चित्र निश्चितच बदलले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील गोरेगाव आणि गोंदिया येथील दोन तरुणांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तर, यंदाही तिरोडा आणि सालेकसा तालुक्यांतील दोन युवकांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. यात सालेकसा तालुक्यातील सचिन बिसेन या युवकाने कुठलेही शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करून चौथ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
यात त्याच्या आईची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. सचिनच्या आईने त्याला शनेहमीच प्रोत्साहान देत त्याचे नैराश्य घालविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने माझी आईच माझा गुरू असल्याचे सांगितले. डॉ. पंकज पटले याने सुद्धा घरीच राहून इंटरनेटच्या मदतीने अभ्यास करून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या दोन्ही तरुणांची पार्श्वभूमी पाहिल्यास स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल वातावरण नसतानाही त्यांनी आहे त्या परिस्थितीत भ्यास करून यश संपादन केले. त्यांच्या या यशाने जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयार करीत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळण्यास मदत झाली आहे.
पोलिस विभागाची ज्ञानपोई ठरतेय महत्त्वपूर्णगोंदिया जिल्हा पोलिस विभागाने आदिवासी दुर्गम व नक्षलप्रभावी भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, तसेच स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल वातावरण, पुस्तके उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी सुरू केलेल्या वाचनालयाची या भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत होत आहे. शिवाय दर रविवारी या विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत याचीही विद्यार्थ्यांना मदत होत आहे.
या गोष्टींवर भर देण्याची गरज
- शासनाने जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू कराव्यात.
- आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे.
- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याची गरज आहे.
अपयशाने खचू नकास्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना, पहिल्याच प्रयत्नांत यश येईलच असे नाही. सचिन बिसेन व पंकज पटले या विद्यार्थ्यांना सुद्धा सुरुवातील अपयशाला सामोरे जावे लागले. पण, ते यामुळे निराश न होता आपल्या चुका नेमक्या कुठे झाल्या याचा शोध घेऊन पुन्हा तेवढ्याच जोमाने अभ्यास केला. यामुळेच त्यांना यश संपादन करता आले. त्यामुळे यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अपयश आले, तरी खचून जाऊ नका, असा संदेश गेला.