५० स्थळांचा विकास करणार

By Admin | Updated: May 5, 2016 01:59 IST2016-05-05T01:59:21+5:302016-05-05T01:59:21+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले ते पुनित झाले आहे. त्यांनी भेटी दिलेल्या राज्यातील ५० स्थळांची निवड करण्यात आली असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल,

Develop 50 sites | ५० स्थळांचा विकास करणार

५० स्थळांचा विकास करणार

पालकमंत्री : भीमघाट येथे बौध्द सामूहिक विवाह
गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी गेले ते पुनित झाले आहे. त्यांनी भेटी दिलेल्या राज्यातील ५० स्थळांची निवड करण्यात आली असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१ मे रोजी छोटा गोंदिया येथील पांगोली नदीकाठावरील भिमघाट येथील बुध्द विहार परिसरात आयोजित बौध्द सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी ए.बी. बोरकर, प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भंते जीवन कीर्ती, भरत क्षत्रीय, धनंजय वैद्य, अशिम शेख, रतन वासनिक, वसंत गणवीर, श्याम चवरे, बंडू ठवरे, पौर्णिमा वालदे, कुंदा भास्कर, मंजुश्री बोरकर, गडपायले उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, मागील २८ वर्षांपासून भीमघाट स्मारक समिती ही बौध्द सामूहिक विवाहाचे आयोजन करीत आहे. अनेक समाजात आजकाल सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. बौध्द समाजात सामूहिक विवाह सोहळे कमी होतात, ही संख्या वाढली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सामूहिक विवाह सोहळ्याची दिशा दिली. डॉ.बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरीत होऊन ही समिती काम करीत आहे. बाबासाहेबांच्या अस्थीचे जतन भिमघाट समितीने केल्यामुळे हा परिसर पावन झाले. भिमघाटाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. भिमघाट समितीने विकासाचे नियोजन करावे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या नवदांम्पत्यांना त्यांच्या सार्थक जीवनासाठी आशिर्वाद दिला. बोरकर म्हणाले, डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मागील २८ वर्षापासून आपण सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहोत. घरोघरी जाऊन विनंती करु न आपल्या पाल्यांचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच करण्याचा आग्रह करीत असतो.
नवदाम्पत्यांना भावी जीवनात रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मदत करण्यात येते. तर असलेला रोजगार आणखी भरभराटीस गेला पाहिजे यासाठी त्यांना मदत करीत असल्याचे सांगितले.
विनोद अग्रवाल म्हणाले, सामूहिक विवाह सोहळे ही आज काळाची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीने भीमघाट समिती काम करीत आहे. भीमघाटच्या विकासासाठी आपणसुद्धा सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी १२ जोडपी या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली.
कार्यक्रमाला बौध्द बांधवांची हजारोच्या संख्येत उपस्थिती होती. संचालन लक्ष्मीकांत डहाट यांनी केले. भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यशस्वीतेसाठी कमलेश वैद्य, किसन भगत, राजू दोनोडे यांच्यासह स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Develop 50 sites