अन् खेळाडूंच्या संयमाचा बांध फुटला

By Admin | Updated: May 30, 2014 00:11 IST2014-05-30T00:11:20+5:302014-05-30T00:11:20+5:30

खेळाडूंसाठी असलेले इंदिरा गांधी स्टेडियम थोड्याश्या मिळकतीसाठी नगर परिषदेकडून विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात आहे. त्यामुळे तेथील मैदानाची पार वाट लागली आहे. या ठिकाणी नियमित

The curtailment of the rest of the players, | अन् खेळाडूंच्या संयमाचा बांध फुटला

अन् खेळाडूंच्या संयमाचा बांध फुटला

खेळाडू रस्त्यावर : न.प. मुख्याधिकार्‍यांना धरले धार्‍यावर
गोंदिया : खेळाडूंसाठी असलेले इंदिरा गांधी स्टेडियम थोड्याश्या मिळकतीसाठी नगर परिषदेकडून विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात आहे. त्यामुळे तेथील मैदानाची पार वाट लागली आहे. या ठिकाणी नियमित विविध खेळांचा सराव करणार्‍या खेळाडूंच्या संयमाचा बांध अखेर तुटला आणि त्यांनी चक्क रेल्वेलाईनवरील उड्डान पुलावर चक्काजाम करून रस्ता अडवून धरला. यामुळे प्रशासनाची काही काळासाठी चांगलीच तारांबळ उडाली.
या मैदानाचा व्यावसायिक उद्देशाने उपयोग करणे उचित नाही अशी जनभावना आहे. त्यातल्या त्यात मैदानाचे नुकसान होईल अशा कोणत्याही कार्यक्रमाला नगर परिषदेने परवानगी देऊ नये असे अपेक्षित आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी विविध कार्यक्रम सुरूच आहेत.
लग्न समारंभ, स्वागत समारंभासारख्या कार्यक्रमामुळे आणि त्या कार्यक्रमाच्या टाकाऊ अन्न पदार्थ, कचर्‍यामुळे सकाळी विविध खेळांच्या सरावासाठी येणार्‍या खेळाडूंची चांगलीच पंचाईत होते. त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे. याबाबत खेळाडूंनी अनेकदा नगर परिषदेकडे तक्रारही केली, पण कार्यक्रमांसाठी या मैदानाचा वापर सुरूच आहे.
गुरूवारी सकाळी खेळाडू नेहमीप्रमाणे स्टेडियममध्ये जमले. परंतू बुधवारी येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या सामूहिक विवाह समारंभाच्या कार्यक्रमाने मैदानाची झालेली दुर्गती पाहून त्यांच्या संयमाचा बांध फुटला. नगर परिषदेच्या वेळकाढूपणाचा निषेध करीत खेळाडूंनी जवळच असलेल्या उड्डानपुलावर जमून रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक अडून पडली. नगर परिषद मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. त्यांनी खेळाडूंना समजावत १ मे नंतर कोणत्याही कार्यक्रमासाठी स्टेडियमचे बुकींग केले नसल्याचे स्पष्ट केले. जे काही कार्यक्रम १ मे नंतर झाले त्यांचे बुकींग आधीच झालेले होते. त्यामुळे यापुढे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत अशी ग्वाही देऊन त्यांनी खेळाडूंना संयम ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: The curtailment of the rest of the players,