कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:12+5:30

तालुक्यातील एक हजार लोकवस्ती असलेल्या चिचगाव या गावाने चारही बाजूने ये-जा होणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि काटेरी फाद्यांनी रस्ता अडवित परिसरातील व लगतच्या गावांना गावबंदी केली आहे. सध्या सर्वत्र जिकडे तिकडे कोरोना आजाराची भीती आहेच. या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Cavalry against the background of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी

Next
ठळक मुद्देदोन गावांनी घेतला निर्णय : रस्त्यावर लाकडे टाकून बंद केला मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय योजना, दंडाची केली तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावकरी सुध्दा खबरदारी घेत आहे. याच पार्श्वभुमीवर तालुक्यातील चिचगाव आणि सटवा या दोन गावानी बुधवारी (दि.२५) गावबंदीचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपर्यंत बाहेरील लोकांना या गावात येण्यास बंदी घालण्यात आली. तसेच बाहेरील कोणतेही वाहन गावात येऊ नये यासाठी रस्त्यावर लाकडे टाकून ठेवले आहे.
तालुक्यातील एक हजार लोकवस्ती असलेल्या चिचगाव या गावाने चारही बाजूने ये-जा होणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि काटेरी फाद्यांनी रस्ता अडवित परिसरातील व लगतच्या गावांना गावबंदी केली आहे. सध्या सर्वत्र जिकडे तिकडे कोरोना आजाराची भीती आहेच.
या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादिशेने चिचगाव येथील माजी सरपंच जितेंद्र कटरे यांनी गावातील युवकांना हाताशी घेउन कोरोनापासून गावकऱ्यांना कसे दूर ठेवता येईल याविषयी चर्चा केली. परिसरातील नागरिकांना गावबंदीकरून कोरोनावर अंकुश लावता येईल असा निर्णय घेण्यात आला. चिचगाव ते सिलेगाव, पूरगाव, सटवा, बघोली हे मुख्य रस्ते बंद करण्यात आले. चिचगाव या लहानशा गावातील गावबंदी सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
विशेष म्हणजे चिचगाव येथे कुणी बाहेरून न विचारता आला तर दीड हजार रुपये दंड ठोकण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. तर गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर निघताना गावकऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
या सामाजिक कार्यात चिचगाव येथील माजी सरपंच जितेंद्र कटरे, सुनील रहांगडाले, मोरेश्वर राणे, बालू खोब्रागडे, संतोष सोनवाने, कमलेश पारधी, संजय पंधरे, राजू पंधरे, विरेंद्र रहांगडाले, बालू बिसेन, दिपक बिसेन, राजेंद्र रहांगडाले, जितेंद्र पारधी, पिंटू उईके, तेजराम राणे, भय्यालाल मानकर, देवेंद्र भिमटे यांनी सहकार्य केले.

दीड हजार रुपयांचा दंड
चिचगाव येथील गावकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गावबंदी केली आहे. तसेच याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी यासाठी गावात परवानगी न घेता येणाऱ्यास दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाला गावकऱ्यांनी सुध्दा सहकार्य केले आहे.
इतर गावांनी सुध्दा करावी अंमलबजावणी
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळीच दक्षता घेतली नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते,असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना सांगितले. तसेच १४ एप्रिलपर्यंत कुणीही घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन केले. याच पार्श्वभुमीवर काही गावकऱ्यांनी उपाय योजना केली आहे. चिचगाव व सटवा येथील गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय इतर गावांनी घेऊन याची अंमलबजावणी करावी असा सूर आवळला जात आहे.

सटवा गावातही गावबंदी
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीला साथ देत सटवा येथील गावकऱ्यांनी गावबंदीचा आदेश काढून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. सटवा गावात गावबंदी करण्यात आली आहे. या गाावतील नागरिकांनी गावाच्या सीमेवरील रस्त्यावर झाडे कापून आडवी टाकली आहेत.गावात कुणी बाहेरून न विचारता आला तर अडीच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर निघताना गावकऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Web Title: Cavalry against the background of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.