दोन हजार प्रवासी क्षमता, ११२ मीटर लांब; महाकाय कॅसिनोला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:37 IST2026-05-07T12:36:32+5:302026-05-07T12:37:28+5:30

मांडवी नदीत येण्याच्या शक्यतेने लोक धास्तावले; न्यायालयाची पूर्वपरवानगी घेऊनच पुढील निर्णय घेऊ : कंपनीने केले स्पष्ट

two thousand passenger capacity 112 meters long opposition to new big casino in goa | दोन हजार प्रवासी क्षमता, ११२ मीटर लांब; महाकाय कॅसिनोला विरोध

दोन हजार प्रवासी क्षमता, ११२ मीटर लांब; महाकाय कॅसिनोला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क,  पणजी : मांडवी नदी आधीच कॅसिनोंच्या विळख्यात सापडलेली असताना डेल्टिन कंपनीने तब्बल २ हजार प्रवाशांची क्षमता असलेले ११२ मीटर लांबीचे आणखी एक महाकाय कॅसिनो जहाज मुरगाव बंदरात आणून जनतेच्या सहनशीलतेला आव्हान देण्याचा संतापजनक प्रयत्न केला आहे.

हायकोर्टाने घेतलेला पवित्रा तसेच जनतेच्या तीव्र रोषाची कल्पना आल्याने अखेर नमते घेत 'न्यायालयाच्या कंपनीला पूर्वपरवानगीशिवाय मांडवी नदीपात्रात है जहाज आणले जाणार नाही,' असे स्पष्ट करावे लागले. हे जहाज मुरगाव बंदरात दाखल झाल्याचे वृत्त काल सकाळी फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सर्वत्र संताप पसरला. आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख वाल्मिकी नायक तसेच इतरांनी चीड व्यक्त केली. योगायोगाने या कॅसिनोविरोधात 'इनफ आणि 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' या संघटनांच्या आव्हान याचिकांवर काल दुपारीच सुनावणी होती. 

सुनावणीवेळी 'कोर्टाच्या परवानगीशिवाय काही करणार नाही' अशी भूमिका घेत कंपनीने तुर्तास थोडे नमते घेतले, असे असले तरी राजधानी शहरात कॅसिनोंचा प्रश्न अजूनही धगधगत आहे. मांडवी नदीने अजून किती काळ कॅसिनोंचा बोजा सहन करायचा?, असा संतप्त सवाल केला जात आहे.

सध्या हे जहाज एमपीएच्या बर्थ क्रमांक ४ वर नांगरण्यात येणार असून मान्सूनपर्यंत, म्हणजेच सुमारे एका महिन्याच्या कालावधीत ते शिपिंग एजंटच्या देखरेखीखाली तिथेच ठेवले जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत जहाजाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच समुद्रातील चाचण्या घेऊन त्याची समुद्र सक्षमतेची तपासणी केली जाणार आहे. मात्र, हे जहाज मुरगावात दाखल झाल्यानंतर ते लवकरच मांडवी नदीत, वेरेच्या बाजूने येणार असल्याची चर्चा रंगू लागल्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, या कॅसिनो प्रकरणावर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 'इनफ इज इनफ' आणि 'पणजीकर अगेन्स्ट कॅसिनो' या संघटनांनी मांडवीतील ७० प्रवाशांच्या जुन्या कॅसिनो जहाजाच्या जागी २ हजार प्रवासी क्षमतेचे नवीन जहाज आणण्यास देण्यात आलेल्या परवानग्यांना आव्हान दिले आहे.
मांडवीत हा महाकाय कॅसिनो येऊ नये, यासाठी 'पणजीकर अगेंस्ट कॅसिनो' संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने विरोध करत आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, नदी परिवहन मंत्री, बंदर कप्तान तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. या जहाजामुळे मांडवी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होईल, असा त्यांचा आरोप आहे.

यापूर्वी वेरे परिसरातील नागरिकांनीही या कॅसिनोला आपल्या भागात येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत आवाज उठवला होता. त्यामुळे हा कॅसिनो प्रत्यक्ष मांडवीत आल्यास व्यापक आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मांडवीत सुरू असलेल्या कॅसिनोंविरोधातही मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाहतूक कोंडी वाढत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. तसेच कॅसिनो संस्कृतीमुळे गोव्याची पारंपरिक संस्कृती बाधित होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

कंपनीचे नमते; ६ जुलै सुनावणी

न्यायालयाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय मांडवीत कॅसिनो जहाज आणले जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर दिले आहे. 'इनफ इज इनफ' या संघटनेने प्रस्तावित कॅसिनो जहाजाविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कंपनीकडून ही भूमिका मांडण्यात आली. या याचिकेवरील पुढील सुनावणी ६ जुलैपर्यंत तहकूब केली आहे. 

सरकारचे म्हणणे....

यावेळी राज्य सरकारची बाजू देखील न्यायालयाने नोंदवून घेतली. जुन्या कॅसिनोचा परवाना नव्या कॅसिनो जहाजाला हस्तांतरित करण्याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास, तो सर्वप्रथम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले.

नवा कॅसिनो आणणार नाही : सीएम

राज्यात नवा कॅसिनो आणणार नाही, असा ठाम पुनरुच्चार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी केला. मांडवी नदीत सध्या कार्यरत असलेल्या ७० आसनक्षमतेच्या तरंगत्या कॅसिनो जहाजाऐवजी २ हजार प्रवाशांची क्षमता असलेले नवे जहाज आणण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, "आम्ही नवे कॅसिनो आणत नाही, हा मुद्दा मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो," असे सांगितले.

वेरेत येणार नाही : केदार नाईक

साळगावचे आमदार केदार नाईक यांनी स्पष्ट केले की, "हा महाकाय कॅसिनो वेरे परिसरात येणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला याबाबत स्पष्ट आश्वासन दिले आहे. त्यामुळे वेरेवासीयांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.

तीव्र विरोध करू : वाल्मिकी

आपचे नेते वाल्मिकी नायक म्हणाले की, पणजीकर अगेंस्ट कॅसिनो या संघटनेमार्फत आम्ही या कॅसिनोला विरोध करत आहोत. हे जहाज मुरगावात दाखल झाले असून ते लवकरच मांडवीत आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे मांडवी नदीच्या पाण्याचे प्रदूषण वाढणार असून हा जहाजाला आम्ही तीव्र विरोध करू.
 

Web Title : कसीनो जहाज से आक्रोश: गोवा पर नया पर्यावरणीय खतरा

Web Summary : गोवा की मांडवी नदी में एक विशाल कसीनो जहाज प्रदूषण की चिंताओं के कारण भारी विरोध का सामना कर रहा है। कंपनी ने अदालत की अनुमति के बिना कोई कदम नहीं उठाने का आश्वासन दिया। यातायात और सांस्कृतिक प्रभाव को लेकर चिंता के बीच विरोध जारी है। सरकार ने पारदर्शिता का वादा किया; मुख्यमंत्री ने कहा कोई नया कसीनो नहीं।

Web Title : Casino Ship Sparks Outrage: Goa Faces New Environmental Threat

Web Summary : A massive casino ship in Goa's Mandovi River faces strong opposition due to pollution concerns. The company assures no move without court permission. Protests continue amidst worries about traffic and cultural impact. Government promises transparency; CM vows no new casinos.