वाळपईत जोरदार वाऱ्यासह पाऊस; झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:23 IST2026-05-16T12:22:55+5:302026-05-16T12:23:17+5:30
वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम

वाळपईत जोरदार वाऱ्यासह पाऊस; झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वाळपई-नगरगाव परिसरासह संपूर्ण सत्तरी तालुक्यात शुक्रवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे तीनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण व वाढलेला उष्मा यानंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला.
वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील विविध भागांत झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे हटवून प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. दुपारपर्यंत बहुतांश रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले होते.
यंदा आंब्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभावात आधीच घसरण झाली आहे. त्यातच रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याची झड झाली. त्यामुळे आंबा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वीज काही काळ खंडित
दरम्यान, आमोणा येथील वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण सत्तरी तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला. वाळपई शहरासाठी पर्यायी मार्गाने तात्पुरता वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये दीर्घकाळ वीज नसल्याने नागरिकांचे हाल झाले. विजेअभावी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला असून, ग्रामस्थांना नदी, नाले आणि विहिरींच्या पाण्यावर विसंबून राहावे लागले.
दाबोस पाणी शुद्धीकरण प्रकल्पालाही दिवसभर वीजपुरवठा न झाल्याने सत्तरीत पाणीपुरवठा ठप्प झाला होता. उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर दाबोस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल.