हृदयद्रावक घटना: नदीतील खेळ बेतला जिवावर; सुट्टीसाठी आलेल्या २ चिमुकल्यांचा बुडून अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 10:58 IST2026-04-26T10:58:03+5:302026-04-26T10:58:03+5:30
घटनेची माहिती मिळताच दोन्ही चिमुकल्यांचे कुटुंबीय घटनास्थळी धावून आले. नदीकाठावर लेकरांचे मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्या वेदनादायी आक्रोशाने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.

हृदयद्रावक घटना: नदीतील खेळ बेतला जिवावर; सुट्टीसाठी आलेल्या २ चिमुकल्यांचा बुडून अंत
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : काणकोण तालुक्यातील भाटपाल परिसरातील वजे नदीत शनिवारी सकाळी दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. ध्रुव उदय वडर (वय ५, नवे वाडे-भाटपाल) व ऋग्वेद ऊर्फ ऋत्विक धनंजय नाईक (वय अंदाजे ९ ते ११, मूळ कारवार) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. शाळेला सुट्टी लागल्याने ऋत्विक काही दिवसांपूर्वीच धुपेमळ येथे आपल्या मावशीकडे आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋत्विक हा मावशीच्या मुलासोबत घरासमोर खेळत होता. त्यानंतर शेजारील घरातील ध्रुवही त्यांच्या खेळात सहभागी झाला. खेळता खेळता ही तिन्ही मुले घरच्यांची नजर चुकवून जवळच असलेल्या वज्रे नदीकाठावर पोहोचली. यावेळी ध्रुव आणि ऋत्विक पाण्यात उतरले. मात्र, पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही क्षणातच दोघेही पाण्यात बुडाले.
सोबत असलेल्या मावशीच्या मुलाने क्षणातच दोघेही पाण्यात दिसेनासे झाल्याचे पाहताच घाबरून आरडाओरड करत घराकडे धाव घेतली. त्याच्या आवाजाने परिसरातील लोक तातडीने घटनास्थळी जमा झाले. यावेळी रोहन नावाच्या एका युवकाने प्रसंगावधान राखत नदीत उडी घेत शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर त्याला दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह सापडले. स्थानिकांच्या मदतीने त्याने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच काणकोण अग्निशामक दलाचे जवान व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह काणकोण येथील सरकारी आरोग्य केंद्रात हलवले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
सुरक्षा उपाययोजनांची मागणी
उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने वज्ञे नदीकाठी आंघोळीसाठी मोठ्या प्रमाणात लोक, विशेषतः लहान मुले येत आहेत. नदीच्या काही भागांत खोल पाणी व अनिश्चित प्रवाह असल्याने धोका संभवतो. अतिउत्साही पर्यटक स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या ठिकाणी तातडीने इशारा फलक लावणे, सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व श्रीस्थळ पंचायतीच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे.
आज अंत्यसंस्कार
घटनेची माहिती मिळताच ऋत्विकचे कुटुंबीय कारवारहून धुपेमळ येथे दाखल झाले. पोलिसांनी सायंकाळी ऋत्विकचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. आज, रविवारी कारवार येथे ऋत्विकवर तर धुपेमळ येथे ध्रुववर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
घटनेची माहिती मिळताच दोन्ही चिमुकल्यांचे कुटुंबीय घटनास्थळी धावून आले. नदीकाठावर आपल्या लेकरांचे मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. त्या वेदनादायी आक्रोशाने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; नदीकाठावरील ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
अर्धा कि.मी. खेळत पोहोचले नदीवर
शाळेच्या सुट्टीमुळे ऋत्विक काही दिवसांपूर्वी धुपेमळ येथे मावशीकडे आला होता. मावशीचा मुलगा आणि शेजारील ध्रुव यांच्यासोबत खेळत असताना तिघेही घरापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील नदीकाठावर गेले. पाहुणचारासाठी आलेल्या ऋत्विकचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.