राज्यपाल वांच्छूंवरही राजीनाम्यासाठी दबाव

By Admin | Updated: June 18, 2014 07:25 IST2014-06-18T07:20:37+5:302014-06-18T07:25:28+5:30

पणजी : उत्तर प्रदेश, कर्नाटकमधील राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांच्यावरही राजीनामा देण्यासाठी दबाव येऊ लागला

The Governor's resignation also resigned | राज्यपाल वांच्छूंवरही राजीनाम्यासाठी दबाव

राज्यपाल वांच्छूंवरही राजीनाम्यासाठी दबाव

पणजी : उत्तर प्रदेश, कर्नाटकमधील राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर आता गोव्याचे राज्यपाल भारत वीर वांच्छू यांच्यावरही राजीनामा देण्यासाठी दबाव येऊ लागला असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळाली.
केंद्रात काँग्रेसप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर असताना ज्या राज्यपालांची नियुक्ती झाली होती, त्या सर्वांना आता राजीनामा द्यावा लागेल, अशी चर्चा देशात सुरू असतानाच उत्तर प्रदेश व कर्नाटकमधील राज्यपालांनी मंगळवारी आपल्या पदांचे राजीनामे दिले. राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा, केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित, गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल व गोव्याचे राज्यपाल वांच्छू यांनाही पद सोडावे लागेल, अशा प्रकारची चर्चा आहे. अल्वा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान मोदी हे गेल्या शनिवारी गोवा भेटीवर आले असता, गोव्याचे राज्यपाल वांच्छू यांच्याशी त्यांची भेट झाली आहे. दुपारच्या वेळी पंतप्रधान काबो राजभवनावर होते. वांच्छू हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत दाबोळी विमानतळावर गेले होते.
दरम्यान, यूपीएने नेमलेले राज्यपाल आता राजीनामे देऊ लागल्याने गोव्याचे राज्यपालही दबावाखाली येऊन राजीनामा देतील, असे मानले जात आहे. राज्यपाल वांच्छू यांचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चांगले संबंध आहेत. अनेकदा शिष्टाचाराचा बाऊ न करता वांच्छू हे गोव्यात फिरताना आढळतात. त्यांनी पर्रीकर सरकारशी कधी संघर्ष केला नाही; पण त्यांची नियुक्ती यूपीए सरकारने केली होती व त्यामुळे त्यांना जावे लागेल, अशी भाजपच्या काही नेत्यांना अपेक्षा आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: The Governor's resignation also resigned