गावांमध्ये सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:34 IST2026-05-12T12:33:15+5:302026-05-12T12:34:10+5:30
कुडणे येथे विविध विकासकामांचा प्रारंभ; फाळवाडा-कुडणे येथील माऊली देवीचे दर्शन.

गावांमध्ये सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, पायाभूत सुविधांसोबतच मानवी विकासावरही विशेष भर दिला जात आहे. साखळी मतदारसंघासह संपूर्ण गोव्यात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. लोकहिताची कोणतीही कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुडणे फाळवाडा प्रभाग ३ येथे विविध विकासकामांच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माऊली मंदिर परिसरात जलस्रोत खात्यातर्फे तळी उभारणीच्या कामाचा प्रारंभ, गणपती विसर्जन स्थळ सुशोभीकरण काम तसेच मंदिर परिसरात शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
धार्मिक उत्सवांमुळे गावचे वातावरण राहते प्रसन्न मुख्यमंत्री म्हणाले की, गावातील मंदिरे ही संस्कृती जपणारी केंद्रे असून, मंदिरांमुळे गावातील एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होतो. धार्मिक उत्सवांमुळे गावातील सामाजिक वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. कुडणे पंचायत क्षेत्रातील सर्व पंचायत सदस्य सक्रियपणे काम करत असून, जनतेच्या मागणीनुसार विकासकामांना गती देण्यात यश आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, कुडणेचे सरपंच दामोदर पेटकर, उपसरपंच दीपिका नाईक, पंचायत सदस्य राजन फाळकर, अभियंता अभिषेक, तेजस्विनी गावकर, विनोद भंडारी, सचिव सुजाता मोरजकर, स्वयंपूर्णा मित्र दीपक गावकर, माऊली देवस्थान समिती सदस्य, फाळवाडा व कुडणे येथील ग्रामस्थ तसेच दिनेश कामत, तानाजीराव देसाई आदी उपस्थित होते.
महेश सावंत, दामोदर पेटकर आणि राजन फाळकर यांनी विकासकामांचा प्रारंभ केल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांचे अभिनंदन केले. फाळवाडा प्रभाग क्रमांक ३ मध्ये माऊली देवीच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त अर्चा-शुद्धी तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध विकासकामांचा प्रारंभकरण्यात आला. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी देवदर्शन घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.