नवरात्र विशेष: म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात नवरात्री नवमीच्या दिवशी पंचमूर्तींचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 08:05 AM2023-10-24T08:05:15+5:302023-10-24T08:06:27+5:30

नवरात्री हा विशेष मोठा उत्सव असून यात देवी नऊ दिवस वेगवेगळ्या आसनांवर विराजमान होते.

goa navratri special darshan of panchmurti on navratri navami at mahalsa temple in mhardol | नवरात्र विशेष: म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात नवरात्री नवमीच्या दिवशी पंचमूर्तींचे दर्शन

नवरात्र विशेष: म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात नवरात्री नवमीच्या दिवशी पंचमूर्तींचे दर्शन

यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: अंत्रुज महालातील सुंदर अशा परिसरामध्ये असलेली म्हार्दोळ फोंडा येथील श्री महालसा व देवीचे देवस्थान हे केवळ गोव्यातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे. देवस्थानला लाभलेले निसर्गसौंदर्य व देवीच्या कीर्तीमुळे हे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. देवीचे भक्त केवळ गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक व कामानिमित्त जगभर स्थायिक झालेले आहेत.

नवरात्री हा विशेष मोठा उत्सव असून यात देवी नऊ दिवस वेगवेगळ्या आसनांवर विराजमान होते. यात हत्ती, मोर, हंस, बदक, वाघ ,घोडा, गरुड या वाहनावर देवीचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते. मखरोत्सवामध्ये सुंदर असे देखणे रूप पाहण्यासाठी राज्यभरातील लोक नवरात्रीला विशेष उपस्थिती लावतात. महालसा नारायणी देवी ही मूळ विष्णू स्वरूपाची असल्यामुळे देवीला तीन रूपामध्ये पाहायला मिळते. विष्णू शक्ती, देवी शक्ती व ईश्वरी शक्ती अशा रूपामध्ये दिसून येते. नवरात्रीला नवमीच्या दिवशी मखरामध्ये पाच मूर्तीचे दर्शन घ्यायला मिळते. यात कांचोळी ही पूर्ण सोन्याची मूर्ती सजवलेली असते तर सातेरी व महालसा देवीची अन्य मूर्ती सजवल्या जातात. या पंच देवींचे दर्शन घ्यायला मिळते.

सर्व लोकांच्या कल्याणासाठी देवस्थान नवचंडी हवन केले जाते व पूर्णाहुती दिली जाते. या देवस्थानामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे होतात. यात नवरात्री, दसरा सीमोल्लंघन सोने लुटणे, पालखी कोजागिरी पौर्णिमा, अवसर कौल, दिवाळी, जत्रा असे विविध उत्सव साजरा केले जातात. या देवस्थानामध्ये आणखी एक मोठा उत्सव म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी लक्ष्मी व इंद्रदेव यांची पूजा केली जाते. या कोजागिरीला जे भक्तगण रात्रभर जागरण करून देवीची आराधना करतात त्यांना लक्ष्मी मातेची विशेष कृपा होते असे मानले जाते. 

याचप्रमाणे या देवस्थानामध्ये आणखी विशेष कार्यक्रम होतो. येथील फुलकार समाज यांच्यातर्फे सत्यनारायण पूजा म्हणजेच जायांची पूजा बांधली जाते. या दिवशी सर्व म्हार्दोळमधील भक्तगण फुलकार समाज एकही जाईचे फुल बाहेर विक्री न करता संपूर्ण फुले देवस्थानामध्ये सत्यनारायण पूजेसाठी अर्पण करतात.

Web Title: goa navratri special darshan of panchmurti on navratri navami at mahalsa temple in mhardol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.