गोंयकार सराफांना धसका; लग्नसराईच्या दिवसांत सोने खरेदी टाळणे लोकांना जाईल जड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:03 IST2026-05-12T13:01:44+5:302026-05-12T13:03:50+5:30
व्यवसायावर अवलंबितांचा प्रश्न, गोवा ज्वेलर्स असोसिएशन करणार सरकारशी चर्चा

गोंयकार सराफांना धसका; लग्नसराईच्या दिवसांत सोने खरेदी टाळणे लोकांना जाईल जड
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वर्षभर लोकांनी सोने खरेदी टाळावी असा केंद्र सरकारचा सल्ला आल्यानंतर गोव्यातील सराफांनी मोठा धसका घेतला आहे. सोनारांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होऊ लागली आहे. दुसऱ्या बाजूने गोव्यात लग्न सराईचा मोसम सध्या जोरात असून अशावेळी आम्ही सोने खरेदी कशी काय टाळू शकतो, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
दरम्यान, राज्यातील सराफ व्यापारी, कारागीर आणि ग्राहकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा ज्वेलर्स असोसिएशनने सरकारसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचे संकेत दिले आहेत. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाबाबत आंदोलन किंवा दुकाने बंद ठेवण्याच्या भूमिकेचे असोसिएशन समर्थन करीत नाही. सर्वांनी संयम आणि शांततेने वागावे. ग्राहक परिस्थिती समजून घेत आहेत. त्यामुळे सरकारसोबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर यांनी दिली.
पंतप्रधानांच्या आवाहनामुळे ऐन लग्नसराईत यामुळे दागिने खरेदीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना गोवा ज्वेलर्स असोसिएशनने सावध भूमिका घेतली आहे.
सध्या लग्नसराईच्या हंगामामुळे दागिने घेण्यासाठी लोकांनी दिलेल्या ऑर्डरची पूर्तता करावी लागेल. पण भविष्यात मात्र या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले. किमान छोट्या स्तरावर व्यवसाय करणाऱ्या कारागिरांवर त्याचा परिणाम होईल अशीही भीती व्यक्त करण्यात आली. छोट्या कारागिरांना मिळणाऱ्या दररोजच्या कामावर अवलंबून राहावे लागले. पण जर खरेदी बंद झाली तर भविष्यात कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचेही सांगण्यात आले.
लग्नसराईमुळे दागिने खरेदी सुरूच राहण्याची चिन्हे
फोंडा : राज्यातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सोने खरेदी ही गुंतवणूक तसेच लग्नकार्यावेळी गरज मानली जाते. त्यामुळे सोन्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे मत येथील काही सोनारांनी व्यक्त केले. येथील एका सोनाराने सांगितले की, जसे वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल आवश्यक असते, तशाच पद्धतीने लग्नसमारंभात सोन्याला महत्त्वाचे स्थान आहे.
लोक काही प्रमाणात काटकसर करू शकतात. मात्र लग्नकार्य टाळू शकत नाहीत. गोव्यात कोणतेही लग्न सोन्याच्या दागिन्यांशिवाय अपूर्ण मानले जाते. त्यामुळे लोक गरजेपुरते सोने खरेदी करतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या व्यावसायिकांनी सांगितले की, फार कमी लोक सोने गुंतवणुकीसाठी खरेदी करतात. बहुसंख्य लोक लग्न समारंभावेळीच दागिने घेतात. वाढत्या किंमतीमुळे आधीच खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे.
ग्राहक म्हणतात, खरेदी होईलच
दरम्यान, फोंडा येथील कल्पना नाईक यांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यांत मुलीचे लग्न ठरले आहे. काही दागिने आधीच तयार करून ठेवले आहेत. मात्र, वरासाठी अंगठी व सोन्याची साखळी घेणे बाकी आहे. लग्नकार्यामध्ये दोन्ही बाजूंनी दागिने देणे आवश्यक असते. त्यामुळे कमी प्रमाणात का होईना, सोने खरेदी करावीच लागेल," असे त्या म्हणाल्या.
वास्कोत सराफांमध्ये नाराजी
वास्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वर्षभर सोने खरेदी टाळा' अशा प्रकारचा सल्ला दिल्याने सराफ व्यवसायाशी संलग्न क्षेत्रांत नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारने परराष्ट्र व्यवहार हाताळण्यास कठीण ठरत असल्यास तो सुधारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मात्र तसे न करता व्यावसायिकांवर विनाकारण निशाणा साधला गेला अशी भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारने सराफी व्यापाऱ्यांच्या हितासाठी योग्य पावले उचलायला पाहिजे होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी टाळा अशी घोषणा करून आमच्या व्यवसायावर संकट आणले आहे. सस्थितीत सोन्याच्या दरात घसरण व्हायला सुरुवात झाल्याचे दिसून येते, असे येथील आर. के. ज्वेलर्सचे रिकेश रायकर यांनी सांगितले.
दूरगामी परिणाम होण्याची भीती
म्हापसा : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सोमवारी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर पंतप्रधानांच्या आवाहनाचे दूरगामी परिणाम व्यवसायावर होईल, अशी माहिती म्हापशातील काही सोनारांनी दिली. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर बाजारात किंचित परिणाम झाल्याची माहिती शहरातील काही सोनारांनी दिली. ग्राहकांची संख्या कमी झाली. व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने पेट्रोलियम पदार्थ आणि सोने यांसारख्या महत्त्वाच्या आयातीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. त्या संदेशाचे पालन लोकांनी करावे. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि परकीय चलन बचतीसाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी पुढील परिणामांचा विचार करूनच हा संदेश दिला आहे. जागतिक परिस्थिती लक्षात घेता देशहितासाठी आवश्यक आर्थिक शिस्त पाळलीच पाहिजे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
सोने खरेदीबाबतचा विषय हाताळण्यास संघटना पूर्णपणे सक्षम आहे. पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सर्व ज्वेलर्सनी पूर्वीप्रमाणेच नियमित, शांततेत व्यवसाय सुरू ठेवावा. या विषयावरील पुढील घडामोडी व संघटनेची भूमिका लवकरच जाहीर केली जाईल. - समीर कुडतरकर, अध्यक्ष गोवा ज्वेलर्स असोसिएशन