आधी खर्च टाळा, मगच सांगा...; काँग्रेसची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:22 IST2026-05-13T12:21:57+5:302026-05-13T12:22:16+5:30
इव्हेंटसवर खर्च करणे, विदेश दौरे कमी करण्याचे आवाहन

आधी खर्च टाळा, मगच सांगा...; काँग्रेसची भाजपवर टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'इंधनाचा वापर कमी करा, सोने खरेदी टाळा', असे आवाहन जनतेला करण्याऐवजी भाजप सरकारने अगोदर इव्हेंटसवर खर्च करणे तसेच नेत्यांनी विदेश दौरे टाळावेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेतून केली.
भारताची ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याच देशाचे पंतप्रधान हे येथील नागरिकांना इंधनाचा वापर कमी करा, सोने खरेदी टाळा, तेलाचा वापर कमी करावा, असे आवाहन करीत आहेत. यावरून देशाचे आर्थिक धोरण पूर्णपणे फेल झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पाटकर म्हणाले की, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारत देशातील केंद्र सरकारला अशा प्रकारे आवाहन करणे शोभत नाही. यावरून केंद्र सरकारकडे अर्थव्यवस्थेबाबत कुठलेही धोरण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानांनी केलेले आवाहन पाळावे, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. हे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री आसामला गेले. खरे तर त्यांनी पंतप्रधानांनी केलेले आवाहन पाळणे आवश्यक होते. त्यांनी त्यांच्या वाहनांच्या संख्येतही कपात करून इंधन वाचवावे. एकूणच नागरिकांना सूचना करण्याऐवजी भाजप सरकारने इव्हेंटसवर खर्च करणे व नेत्यांचे विदेश दौरे अगोदर टाळावेत, अशी मागणी केली.
दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नाडिस म्हणाले की, पंतप्रधानांनी १७मिनिटांचे भाषण करून लोकांमध्ये भीती निर्माण केली. पंतप्रधान विकसित भारत २०४७ वर बोलतात, प्रत्यक्षात मात्र त्यांनी देश १९४७ मध्ये नेला आहे. तेल, इंधनाचा वापर करावा, असे ते म्हणतात. यावरून सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेने सरकारवर अवलंबून राहू नये, हे त्यातून स्पष्ट झाल्याची टीका त्यांनी केली.