काम करा, नाही तर पद रिकामी करा!बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:16 IST2026-04-30T12:15:53+5:302026-04-30T12:16:34+5:30
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने प्रदेश भाजपने संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीतीवर खलबते सुरू केली आहेत.

काम करा, नाही तर पद रिकामी करा!बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांनी सुनावले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पदे घेऊन केवळ खुर्च्या तापवणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने कडक भूमिका घेतली आहे. काल राज्य पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी 'काम करा, नाहीतर पद रिकामी करा,' असा स्पष्ट इशारा दिला.
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने प्रदेश भाजपने संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीतीवर खलबते सुरू केली आहेत. याचाच एक भाग म्हणून काल बुधवारी राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. भाजपच्या येथील प्रदेश कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. दामू यांच्यासोबत राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सर्वानंद भगत, सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी मार्गदर्शन केले.
विधानसभेची निवडणूक सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपली असून बैठकीत प्रामुख्याने पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देण्यात आला. बूथ स्तरापासून ते प्रदेश स्तरापर्यंत पक्षाची यंत्रणा कार्यक्षम करणे, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे, विशेष जनसंपर्क मोहीम आखणे यावर चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांनी मते मांडली. कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी आणि त्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला.
कामचुकारपणा चालणार नाही : नाईक
'लोकमत' प्रतिनिधीने दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'पदाधिकाऱ्यांनी कामचुकारपणा करून चालणार नाही. काम न करणाऱ्यांनी पदावर राहण्यात अर्थ नाही हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. २०२७ ची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी आम्हाला लढवायची आहे. त्यासाठी सरकारने जी काही चांगली कामे केली आहेत ती झाकली जाऊ नयेत. लोकांपर्यंत ती पोहचवा, असे मी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. चार विभागांमध्ये भाजपचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. ८० लाख वक्ते आम्हाला निर्माण करायचे आहेत. संघटन ही आमची ताकद आहे. बूथ, मंडल स्तरावरील मजबुतीकरण, पन्नाप्रमुखांचे काम या गोष्टींमुळेच भाजपला निवडणुका जपणे सोपे जाते.'