विद्यालये फॅक्टरीसारखी चालवू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:37 IST2026-04-21T07:36:56+5:302026-04-21T07:37:43+5:30
विद्यार्थ्यांच्या करिअरकडे लक्ष देण्याचा सल्ला

विद्यालये फॅक्टरीसारखी चालवू नका: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'विद्यालय चालवणे म्हणजे फॅक्टरी चालवणे नव्हे किंवा हा व्यवसायही नव्हे. विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याकडे आधी लक्ष द्या,' असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. 'करियर जागोर' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी शिक्षकांची अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर, शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रा. गोविंद पर्वतकर, उच्च शिक्षण खात्याचे संचालक भूषण सावईकर, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाचे संचालक विनायक कांबळी उपस्थित होते.
सावंत म्हणाले की, 'गेल्या सात वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत शिक्षण खाते मी माझ्याकडेच ठेवले. इतर खात्यांपेक्षा मी माझा वेळ शिक्षण खात्यालाच जास्त देतो. कौशल्यपूर्ण शिक्षणावर माझा भर आहे. विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. २०२९ चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणल्यानंतर पदवी अभ्यासक्रम आणि त्यापुढेही विविध पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. मार्गदर्शक म्हणून करिअर अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत माहिती द्यायला हवी.'
'त्या' दहा विद्यालयांना शिक्षा होणार
'करियर अॅम्बेसिडर नियुक्तीसाठी शिक्षक न पाठवलेल्या त्या दहा विद्यालयांना कडक शिक्षा केली जाईल' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'ज्या शिक्षकांनी करियर अॅम्बेसिडर म्हणून काम करण्याची तयारी दाखवून नियुक्तिपत्रे घेतली आहेत, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला निश्चितच मिळणार आहे.' दरम्यान, अर्ध्या दिवसाच्या सत्रात धवल गांधी यांनी रिसोर्स पर्सन म्हणून यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
पैसे नाहीत म्हणून शिक्षण अडलेले नाही
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पैसे नाहीत म्हणून शिक्षणासाठी कोणीही अडून राहिलेले नाही. आम्ही डायमंड ज्युबिली योजना आणली. त्या अन्वये अभियांत्रिकी किंवा इतर तांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची खासगी महाविद्यालयांमध्ये वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतची फी सरकार भरते. बी.ए., बी. कॉम. पदवीधर होऊन विद्यार्थ्यांना घरात बसावे लागू नये. यासाठी तांत्रिकी शिक्षणाकडे भर दिला जात आहे.