खासगी, औद्योगिक गुंतवणुकीशिवाय विकास अशक्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 08:00 IST2026-04-17T07:59:40+5:302026-04-17T08:00:06+5:30
संस्थापक स्वर्गीय मोहन काकुलो यांच्या जयंती दिनी हा कार्यक्रम पार पडला.

खासगी, औद्योगिक गुंतवणुकीशिवाय विकास अशक्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : खासगी व औद्योगिक गुंतवणुकीशिवाय राज्याचा विकास शक्य नसून अधिकाधिक लोकांनी व्यवसाय सुरू करून रोजगारनिर्मिती करावी. खाणव्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने गोव्यात अनेक संधी उपलब्ध असून, त्या स्थानिकांनीच साधाव्यात, अन्यथा इतरजण त्याचा लाभ घेतील, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
करासवाडा येथे काकुलो अर्थमुव्हर्सच्या दुसऱ्या ३ एस (सेल्स, सर्व्हिस अँड स्पेअर्स) सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जेसीबी इंडिया लिमिटेडचे समूह कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शेट्टी, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मनोज काकुलो, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सूरज काकुलो, ऑपरेशन्स व्यवस्थापक मानव काकुलो, महाव्यवस्थापक हारून शेख यांच्यासह काकुलो कुटुंबीय उपस्थित होते.
संस्थापक स्वर्गीय मोहन काकुलो यांच्या जयंती दिनी हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या दृष्टीकोन, मूल्ये आणि वारसा यांना अभिवादन करत हा क्षण संस्थेसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. काकुलो अर्थमुव्हर्सची कहाणी आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करून गोव्याच्या विकासासाठी अधिक गुंतवणुकीच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
मनोज काकुलो यांनी सांगितले की, उत्तर गोव्यातील नवीन ३एस सुविधा हा कंपनीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. १९७९ पासून जेसीबीसोबत असलेले नाते आजही कायम असून, पाचव्या पिढीपर्यंत व्यवसाय पुढे चालत असल्याचे त्यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा निर्माण, रोजगारनिर्मिती आणि विकासासाठी सरकारसोबत काम करत राहू, असे त्यांनी आश्वासन दिले.
दीपक शेट्टी यांनी काकुलो समूहाशी चार दशकांहून अधिक जुने नाते असल्याचे सांगत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. विश्वास आणि दीर्घकालीन संबंध ही काकुलो संस्थेची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
१९७९ मध्ये स्थापन झालेली काकुलो अर्थमुव्हर्स कंपनी जवळपास ५० वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. नवीन सुविधा आधुनिक पायाभूत सुविधांनी सज्ज असून, विक्री, सेवा व स्पेअर्स एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कंपनीने गोव्यातील पायाभूत सुविधा विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असून, बॅकहो लोडर्समध्ये सुमारे २० टक्के आणि एक्स्कॅव्हेटर्समध्ये सुमारे २५ टक्के बाजारहिस्सा राखला आहे.