लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सरकारने पर्वरी येथे आंबेडकर भवनाची पायाभरणी केली आहे. पुढील वर्षापर्यंत ते पूर्ण होईल. तसेच अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध केली जाईल' अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मंगळवारी बाबासाहेबांच्या १३५व्या जयंतीनिमित्त येथील आंबेडकर उद्यानात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते.
'पणजी तसेच आजूबाजूच्या परिसरातील महाविद्यालयांमध्ये तसेच गोवा विद्यापीठात शिक्षण घेणारे, तेथे शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होईल' असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोवा गृहनिर्माण मंडळाकडून सरकारने सहा कोटी रुपये देऊन आंबेडकर भवनासाठी ही जागा घेतली आहे. या प्रकल्पाचा विकास करण्यासाठी सरकारने जीएसआयडीसीकडे निधीही डिपॉझिट केला आहे. या भवनात आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती उपलब्ध केली जाईल. त्यामुळे त्यांचे विचार भावी पिढीपर्यंत पोहोचतील. शिका, संघर्ष करा व एकत्र या हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मंत्र आहे. त्याचे पालन गोवा सरकार करीत आहे. त्यांच्या मंत्राचे पालन केले तर न्याय व हक्कापासून कुणीही वंचित राहू शकणार नाही.'
मुख्यमंत्री म्हणाले, 'आज जेव्हा एससी समाजाचे विद्यार्थी ९३ टक्के किंवा त्याहून जास्त गुण प्राप्त करतात व त्यांचा सन्मान करण्याची मला संधी मिळते - तेव्हा फार आनंद होतो. या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षण संचालनालयातर्फे शिष्यवृती योजना राबविली जात आहे.'यावेळी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आंबेडकर भवन हा समाजाचा सन्मान : फळदेसाई
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, 'आंबेडकर भवन ही केवळ एक इमारत नसून ती समाजासाठी सन्मान आणि आधाराचे प्रतीक आहे. युवकांसाठी प्रशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. या ठिकाणी सभागृह आणि मंचाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल. याशिवाय, दुर्गम भागातील युवकांना अधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी त्यांच्यासाठी निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.'
आंबेडकरांचा पराभव काँग्रेसमुळे
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवूनही त्यांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवास काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसमुळेच आंबेडकर हे लोकसभेत पोहचू शकले नाहीत' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
भाषण कमी, काम जास्त
आमदार आर्लेकर म्हणाले की, 'मी नेहमीच भाषण कमी व काम जास्त करतो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर मैदान, भवन व्हावे यासाठी सतत प्रयत्न केले. त्यातूनच कोरगाव मैदानाला त्यांचे नाव देण्यात आले. यापूर्वीच्या आमदारांनी काहीच केले नाही. आंबेडकर भवन व्हावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले आहेत. आज, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे आंबेडकर भवनाचे स्वप्न पूर्ण झाले, असे त्यांनी नमूद केले.
आमचे सरकार हे अंत्योदय तत्त्वावर चालत असून, वंचितांना त्यांचे हक्क देत आहे. समाज कल्याण खात्यामार्फत सरकार लोकांच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहे. - प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant announced the Ambedkar Bhavan in Parvari will be completed next year. Hostel facilities for Scheduled Caste students will also be provided. He criticized Congress for Ambedkar's election defeats. Minister Phaldessai highlighted the Bhavan as a symbol of respect and support for the community.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने घोषणा की कि परवरी में आंबेडकर भवन अगले साल तक पूरा हो जाएगा। अनुसूचित जाति के छात्रों के लिए छात्रावास की सुविधा भी उपलब्ध कराई जाएगी। उन्होंने आंबेडकर की चुनावी हार के लिए कांग्रेस की आलोचना की। मंत्री फालदेसाई ने भवन को समुदाय के लिए सम्मान और समर्थन का प्रतीक बताया।