दोन कृषी पर्यवेक्षकांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक

By Admin | Updated: September 17, 2014 23:47 IST2014-09-17T23:47:51+5:302014-09-17T23:47:51+5:30

कृषी विभागामार्फत खोदण्यात येणारे शेततळे व कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याचे काम मिळवून देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच मागितल्या प्रकरणाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

Two agricultural supervisors are arrested in the case of bribery | दोन कृषी पर्यवेक्षकांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक

दोन कृषी पर्यवेक्षकांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक

गडचिरोली : कृषी विभागामार्फत खोदण्यात येणारे शेततळे व कोल्हापुरी पद्धतीचे बंधाऱ्याचे काम मिळवून देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच मागितल्या प्रकरणाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून दोन कृषी पर्यवेक्षकांना अटक केली आहे. त्यांच्या विरूद्ध कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ मिळावा याकरिता कृषी विभागामार्फत शेततळे व कोल्हापुरी बंधारे बांधण्याचे काम करण्यात येत आहे. आरमोरी तालुक्यातही शेततळे व कोल्हापुरी बंधारे बांधण्याच्या कामासाठी कंत्राट देण्याकरिता तालुका कृषी कार्यालयातील वर्ग ३ चे कृषी पर्यवेक्षक वसंत वंजारी व गोविंद भोयर यांनी कंत्राटदाराला २ लाख रूपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज वसंत वंजारी व गोविंद भोयर या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या विरूद्ध सेक्शन ७ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर विभागीय पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक मतकर, पोलीस उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. गेल्या साडेआठ महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १५ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Two agricultural supervisors are arrested in the case of bribery