छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांना हाेताे जनावरांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:49+5:302021-01-08T05:58:49+5:30

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात ...

Supply of handloom animals to traders in Chhattisgarh | छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांना हाेताे जनावरांचा पुरवठा

छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांना हाेताे जनावरांचा पुरवठा

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात सक्रिय झाली आहे. तालुका मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमगाव येथील अड्ड्यावर रात्रीच्या सुमारास छत्तीसगड राज्यात पाळीव जनावरे पुरविली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाळीव जनावरांच्या खरेदी, विक्री व तस्करीचा व्यवसाय जाेमात सुरू आहे. कळमगाव या जंगलव्याप्त गावात मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील जनावरांची खरेदी करून अड्ड्यावर जमा केले जाते. सक्रिय टाेळीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेली जनावरे रात्रीच्या सुमारास वाहनात काेंबून कळमगाव येथील अड्ड्यावर पाेहोचविली जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील काही तालुका मुख्यालय तसेच छत्तीसगड राज्यात दलालाच्या मार्फत पुरवठा केला जातो. एका जनावराची १० ते १५ हजार रुपयात विक्री करून दिवसाकाठी एका जनावरामागे तस्करांना दीड ते दाेन हजार रुपये मिळतात. २० ते २५ जनावरांचे ३० ते ४० हजार रुपये मिळतात. गाेवंश तस्करीच्या गाेरखधंद्यातील दलाल गांधीनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून मागील अनेक वर्षांपासून त्यांचे स्थानिक पाेलिसांशी मधूर संबंध असल्याची माहिती आहे. दरम्यान, दलालाने जनावरांची खरेदी करण्यासाठी टाेळी तयार केली असून या माध्यमातून हा धंदा जाेमात सुरू आहे. पाळीव जनावरे पुरवठा करणाऱ्या दलालांना प्रती जनावर ५०० रुपये कमिशन दिले जात आहे. कायद्याने पाळीव जनावरे व गाेवंश तस्करी व विक्रीवर बंदी आहे. मात्र, देसाईगंज तालुक्यात कत्तलीसाठी पाळीव जनावरे पुरविण्याचा धंदा सध्या जाेमात सुरू आहे. मात्र, या गाेरखधंद्यास पाेलीस विभागाची मूकसंमती असल्याचे बाेलले जात आहे.

बाॅक्स...

वाघाच्या भीतीने तस्करांचे फावले

देसाईगंज तालुका मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले कळमगाव हे जंगलव्याप्त गाव असून या गावाच्या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने काेणत्याही प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी या भागात दाैरे करीत नाहीत. कारवाईची जबाबदारी असलेल्या पाेलीस विभागाचसुद्धा या जंगलव्याप्त गावात जाऊन धाडसत्र राबविण्याची हिंमत दिसून येत नाही. एकूणच वाघाच्या भीतीने पाळीव जनावर तस्करांचे चांगलेच फावले आहे.

Web Title: Supply of handloom animals to traders in Chhattisgarh