ग्रामज्योती योजना सर्वत्र पोहोचवा

By Admin | Updated: July 15, 2015 01:51 IST2015-07-15T01:51:42+5:302015-07-15T01:51:42+5:30

केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात विद्युतची कामे घेण्यात आली आहेत.

Spread the gramjyoti scheme everywhere | ग्रामज्योती योजना सर्वत्र पोहोचवा

ग्रामज्योती योजना सर्वत्र पोहोचवा

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : अशोक नेते यांचे आवाहन
गडचिरोली : केंद्र शासनाच्या पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात विद्युतची कामे घेण्यात आली आहेत. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात योग्य विद्युत सेवा निर्माण होण्यासाठी ग्रामज्योती योजना गावागावांत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या कामासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी रणजीतकुमार, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता किशोर मेश्राम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता हिरवकर, उपअभियंता सारवे, उपअभियंता हनमारे, चापले, गिरीपुंजे आदी उपस्थित होते.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी सांगितले की, पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रासाठी २ हजार ५०० रूपये कोटींची तरतूद विद्युतच्या कामासाठी करण्यात आली आहे. यापैकी गडचिरोली जिल्ह्यासाठी विद्युत कामांकरिता ५३ कोटी रूपये शासनाने मंजुर केले आहेत. या निधीतून ३३ केव्हीचे विद्युत केद्र उभारणे, जिल्ह्यातील विद्युत जनित्रांची विद्युत क्षमता वाढविणे, दुर्गम भागात विद्युत सेवा पोहोचविणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.
जिल्ह्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी विजेचा दर कमी आकारण्यात यावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले. कुरखेडातील पुराडा, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली येथे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेले ३३ केव्ही उपकेंद्राला मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे, चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील विद्युत उपकेंद्राचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करावेत. मीटर रिडींगमध्ये बिघाड असलेल्या वीज ग्राहकांना सरासरी विद्युत बिल देण्याच्या सूचना खा. नेते यांनी दिल्या. यावेळी महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवा
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ग्रामज्योती योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला कमी निधी मंजुर करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील १२२ गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याने किमान १०० ते १५० कोटींचा निधी मंजुर करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशा सूचना खा. नेते यांनी अधीक्षक अभियंत्यांना बैठकीत केल्या.

Web Title: Spread the gramjyoti scheme everywhere