आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छत व सिलिंग तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 05:00 AM2021-09-27T05:00:00+5:302021-09-27T05:00:42+5:30

सन २०२१ जानेवारी या वर्षात वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताची दुरुस्ती, छताच्या खाली सिलिंग, रंगरंगोटी व टाइल्स लावणे या कामासाठी १६ लाख रुपयांचे ई-टेंडरिंग होऊन गोंदिया येथील एका कंत्राटदाराने या कामाचे कंत्राट घेतले. कामात अनेक त्रुटी असूनही अजूनही एक काम पूर्ण झाले नाही. पूर्वी जे कौलारू छत होते त्याला काढून टीनचे पत्रे टाकण्यात आले; पण इमारतीवर माकडे चालली तरी पत्रे तुटून पडत आहेत.

The roof and ceiling of the health center building were broken | आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छत व सिलिंग तुटले

आरोग्य केंद्राच्या इमारतीचे छत व सिलिंग तुटले

googlenewsNext

लाेकमत न्यूज  नेटवर्क
वैरागड : आरमोरी तालुक्यातील वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे कौलारू छत काढून त्यावर टीन पत्रे टाकून छताची दुरुस्ती करण्यात आली. सिलिंग लावून रंगरंगोटी करण्यात आली. या कामांवर १६ लाख रुपये खर्च झाले. मात्र, एका वर्षातच या दवाखान्याचे छत आणि सिलिंग तुटल्याने दुरुस्ती कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 सन २०२१ जानेवारी या वर्षात वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छताची दुरुस्ती, छताच्या खाली सिलिंग, रंगरंगोटी व टाइल्स लावणे या कामासाठी १६ लाख रुपयांचे ई-टेंडरिंग होऊन गोंदिया येथील एका कंत्राटदाराने या कामाचे कंत्राट घेतले. कामात अनेक त्रुटी असूनही अजूनही एक काम पूर्ण झाले नाही. पूर्वी जे कौलारू छत होते त्याला काढून टीनचे पत्रे टाकण्यात आले; पण इमारतीवर माकडे चालली तरी पत्रे तुटून पडत आहेत. दवाखान्याच्या खोल्यांना छताखाली सिलिंग लावले आहे ते देखील आपोआप तुटून पडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात कर्मचारी क्वाॅर्टरमध्ये दुसऱ्या एका ई-टेंडरिंगद्वारे नळाच्या फिटिंगचे काम करण्यात आले होते. ते नळाची फिटिंग अयोग्य असून, नळाद्वारे पाणी येत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. सरकारी दवाखान्याच्या दुरुस्ती केलेल्या कामाचा दर्जा योग्य नसल्याने वर्षभरात तुटफूट झाली. 
काही काम अजूनही अपूर्ण असतानादेखील संबंधित कंत्राटदाराने ई-टेंडरनुसार काम पूर्ण झाले असे प्रमाणपत्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास वाघधरे यांनी दिले. 

अन् अनर्थ टळला
२५ ऑगस्ट २०२१ रोजी सोमवारी वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यादृष्टीने लाभार्थ्याची निवड करण्यात आली. शिबिराला लागणारी पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली. २४ ऑगस्ट २०१९ रोजी सोमवारी ऑपरेशन थिएटरचे संपूर्ण सिलिंग कोसळले. ते सिलिंग २५ ऑगस्टला कोसळले असते तर मोठा अनर्थ झाला असता. कदाचित रुग्णाचा जीव देखील गेला असता आणि याचे सर्व खापर वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित आरोग्य कर्मचारी यांच्यावर फोडण्यात आले असते.

दवाखान्याचे छत दुरुस्ती, सिलिंग, टाइल्स लावणे व रंगरंगोटीचे काम अपूर्ण आहेत. याबाबत रुग्ण कल्याण समितीला वारंवार माहिती दिली व जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण काम पूर्ण झाले असे प्रमाणपत्र देणार नाही, असे सांगितले; पण रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्ष जि. प. सदस्या मनीषा दोनाडकर यांनी उर्वरित काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मी घेते; पण तुम्ही संबंधित कंत्राटदाराची अडवणूक करू नका, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्या, असे सांगितले, त्यामुळे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले. 
-डॉ. विलास वाघधरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड. 
 

 

Web Title: The roof and ceiling of the health center building were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.