राजनांदगाव पोलिसांची कुरखेडात धाड

By Admin | Updated: May 6, 2015 01:40 IST2015-05-06T01:40:13+5:302015-05-06T01:40:13+5:30

छत्तीसगडमधून चारचाकी वाहनांचे चोरी केलेले सुटे भाग विकणाऱ्या एका टायर वर्क्सच्या दुकानावर

Rajnandgaon Police's Kurkkadeet raid | राजनांदगाव पोलिसांची कुरखेडात धाड

राजनांदगाव पोलिसांची कुरखेडात धाड


कुरखेडा : छत्तीसगडमधून चारचाकी वाहनांचे चोरी केलेले सुटे भाग विकणाऱ्या एका टायर वर्क्सच्या दुकानावर मंगळवारी राजनांदगाव पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीस अटक केली. अली अहमद अंसारी असे आरोपीचे नाव आहे. राजनांदगाव पोलिसांनी अकस्मात टाकलेल्या या धाडीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
राजनांदगाव येथे गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनांचे सुटे भाग चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने तेथील वाहनधारक धास्तावले होते. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर प्रकरणाचा तपास राजनांदगाव येथील क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी वेगाने तपास कार्यास सुरुवात केल्यानंतर सुटे भाग चोरीच्या प्रकरणाचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे राजनांदगाव क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक के.एम.खान यांनी मंगळवारी दुपारी कुरखडा येथे पोहचून सर्वप्रथम तेथील स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्यांचे सहकार्य घेतले. त्यानंतर त्यांनी अली टायर वर्क्स या दुकानावर धाड टाकली. लागलीच या दुकानाचा मालक अली अहमद अंसारी यास गाडीत कोंबून नेले. चोरट्यांची टोळी राजनांदगाव येथून चारचाकी वाहनांचे सुटे भाग चोरुन अंसारीला विकत होती आणि अंसारी हे सुटे भाग इतरांना विकत होता. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून, येथे चोरट्यांची टोळी सक्रिय आहे काय, याविषयीचा तपास राजनांदगाव क्राईम ब्रँचचे अधिकारी करीत आहेत. सदर घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातही सुटे भाग विकणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rajnandgaon Police's Kurkkadeet raid