Over 18 animals killed in vehicle accident | वाहन उलटून १८ जनावरे ठार

वाहन उलटून १८ जनावरे ठार

ठळक मुद्देकत्तलीसाठी हैदराबादकडे जात होती : भीमपूर नाल्याच्या वळणावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कत्तलीसाठी हैदराबाद येथे जनावरे नेणारे वाहन उलटल्याने या अपघातात १८ जनावरे जागीच ठार तर दोन जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोरचीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या भीमपूर नाल्याच्या वळणावर घडली.
गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ककोडी येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी २३ जनावरे टीएस-३१-टीओ-७०३ या क्रमांकाच्या सहाचाकी कंटेनर ट्रकमध्ये कोंबून नेली जात होती. दरम्यान भीमपूर नाल्याच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात १८ जनावरे जागीच ठार झाले तर जीवंत पाच पैकी दोन जनावरे गंभीर जखमी झाले. सदर बैलाचे मालक व व्यापारी नागपूर येथील असल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात कोरची पोलीस ठाण्यात वाहनचालक फारूख शेख, नासिर शेख रा.बल्लारपूर (चंद्रपूर) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे सोबत असलेले दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यांच्या विरोधातही कोरची पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर रोजी भादंविचे कलम २७९, ४२७, ९, ११, ५ (अ) (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
इमरान शेख रा.गडचांदूर असे वाहन मालकाचे नाव आहे. भीमपूर गावाजवळ विरूद्ध दिशेने येत असलेल्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडखाली उतरून शेतशिवारात घुसला.
अपघात झाल्याचे कळताच कोरचीच्या पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळ गाठले. जखमी झालेल्या ट्रकचालक व वाहकाला त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वाहनामध्ये मृत पावलेल्या जनावरांना जेसीबीच्या सहाय्याने व लोकांच्या मदतीने ट्रकच्या बाहेर काढण्यात आले.
मृत जनावरांचे भीमपूर जंगल परिसरात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेवगडे, डॉ.खंडाते, डॉ.गावित, डॉ.दुधकुवर यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली. जखमी असलेल्या जनावरावर औषधोपचार करून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले करीत आहेत.

यापूर्वीही ट्रक फसल्याने २५ जनावरे बचावली
यापूर्वी कोरची तालुक्यातून ट्रकमधून २५ जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू होती. सदर ट्रक गुप्तेकसा गावाजवळ फसला. त्यावेळी लोकांनी पुढाकार घेऊन येथील जनावरे पकडली व त्यांची सुटका केली. याशिवाय कोरची येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बोरी येथील अवैध कत्तीसाठी जाणाऱ्या जनावरांना सापळा रचून जनावरांनी भरलेले दोन ट्रक पकडले होते. या दोन्ही प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही.

२५ ठाण्यांची हद्द पार करून जनावरांची तस्करी
कोरची तालुक्यातील बोरी, घुगवा, बोटेकसा, कोटरा तसेच कोरची पोलीस ठाण्याच्या सीमेलगत असलेल्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकोडी, चिपोटा, मांगाटोला हे नागपूर येथील कसायांचे माहेरघर आहे. दररोज एक ते दोन ट्रक भरून येथून जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या तीन जिल्ह्यातील २५ पेक्षा अधिक पोलीस स्टेशनची हद्द ओलांडून जनावरे हैदराबादपर्यंत नेली जातात.

आम्ही हजार रुपये मजुरीने शेख या जनावर तस्कराकडे काम करतो, मिसपिरीवरून जनावरे वाहनात टाकून कोरची, कुरखेडा, देसाईगंज, नागभिड, सिंदेवाही, मूल, चंद्रपूर ते आंध्रप्रदेशाच्या सीमेपर्यंत नेऊन देण्याचे काम आमच्याकडे आहे, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनचालकाने पोलिसांना सांगितले. आंध्रप्रदेशाच्या सीमेवरून दुसºया वाहनाच्या सहाय्याने जनावरे हैदराबादला नेले जातात, अशी माहिती त्याने पोलिसांनी दिली.

कोरची तालुक्यातून दुवा, बोरी, कोटगूल तसेच गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड तसेच छत्तीसगडमधील दिसपूर येथून अवैधरित्या नागपूर तसेच हैदराबादकडे कत्तलीसाठी पाळीव जनावरांची तस्करी केली जाते. शेकडो गायी, बैल कसायाच्या तावडीत सापडत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Over 18 animals killed in vehicle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.