जिल्ह्यातील पक्षी, प्राण्यांची संख्या वाढली

By Admin | Updated: July 12, 2015 02:06 IST2015-07-12T02:06:50+5:302015-07-12T02:06:50+5:30

जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती.

The number of birds and animals in the district increased | जिल्ह्यातील पक्षी, प्राण्यांची संख्या वाढली

जिल्ह्यातील पक्षी, प्राण्यांची संख्या वाढली

गणनेतून पुढे आली आकडेवारी : जंगलाची घनता वाढल्याचा परिणाम
गडचिरोली : जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत वन विभागाने वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून प्लाँटेशन कार्यक्रम राबविल्याने असलेल्या जंगलाची घनता वाढविण्यात वन विभागाला मोठे यश आले. त्यामुळे या जंगलाकडे पाठ फिरविलेले प्राणी व पक्षी पुन्हा सुरक्षित जंगल म्हणून गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्याला आलेले आहेत, असे निरीक्षण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविलेले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, कोरची, कुरखेडा, धानोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. मात्र या जंगलात पुर्वी माणसांचा वावर वाढायला लागला होता. गेल्या २- ३ वर्षात वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे असलेल्या जंगलाची घनता वाढण्यास मदत झाली. त्यानंतर या जंगलात पशु व पक्ष्यांचा वावर वाढू लागला आहे.
नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेत आलापल्ली वन विभागात चितळ, सांबर, उदमांजर, जंगली माकडे, रानडुक्कर, गवा, निलगाय, उडणारी खार व मोरांची संख्या वाढल्याची माहिती पुढे आली आहे.
आलापल्ली वन परिक्षेत्रात रानकुत्रे ४, अस्वल १, कोल्हे २७, रानमांजर ५, चितळ ५०१, भेडकी ५, रानडुक्कर २९४, निलगाय ३६, मोठी मांजर, खवल्या मांजर १, मोर ७५ आढळल्याचे वन्यप्रेमीजणांचे म्हणणे आहे. वन विभागाची आकडेवारी यापेक्षा वेगळी असू शकते. मात्र जिल्ह्यात गेल्या काही वर्षात प्राणी व पक्ष्यांची संख्या जंगलामध्ये वाढलेली आहे. याबाबीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. चामोर्शी वन परिक्षेत्रात लोकसहभागातून काम करण्यात आल्याने प्राण्यांची संख्या वाढल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शंकर गाजर्लावार यांनी म्हटले आहे.

Web Title: The number of birds and animals in the district increased