'नीट'ला AIद्वारे सुरुंग, गडचिरोलीत दोन हायटेक काॅपीबहाद्दरांवर गुन्हा; दोन ठिकाणी प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 20:41 IST2026-05-04T20:39:34+5:302026-05-04T20:41:28+5:30
सुरक्षा भेदून मोबाइल केंद्रात

'नीट'ला AIद्वारे सुरुंग, गडचिरोलीत दोन हायटेक काॅपीबहाद्दरांवर गुन्हा; दोन ठिकाणी प्रकार उघडकीस
गडचिरोली : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत घेतलेल्या 'नीट'मध्ये शहरात दोन केंद्रांवर हायटेक कॉपीचे खळबळजनक प्रकार ३ मे रोजी उघडकीस आले आहेत. कडक सुरक्षा यंत्रणा आणि तपासणीला बगल देऊन दोन विद्यार्थी थेट परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन शिरले. चक्क एआयच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या एका विद्यार्थ्यासह एका विद्यार्थिनीवर गडचिरोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर (क्र. ३१२५१०२) एकूण ३६० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. परीक्षा सुरू असताना दुपारी ३:४० च्या सुमारास खोली क्र. ६ मधील पर्यवेक्षक राजेश पाटील आणि राखी मुधोळकर यांना चंद्रपूरच्या नागभिड येथील २० वर्षीय विद्यार्थिनीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिची तपासणी केली असता, तिच्याकडे आकाशी रंगाचा मोबाईल मिळून आला. धक्कादायक म्हणजे, तिने यावर्षीचा पेपर आपल्या वस्त्रात लपवून ठेवला होता आणि जुन्या वर्षाचा पेपर मुख्य पृष्ठाला जोडून कॉपी करण्याची तयारी केली होती.
'त्याने' एआयला प्रश्न पाठवून लिहिली उत्तरे
शहरातील गोकुळनगर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावर (क्र. ३१२५१०१) आष्टी येथील १७ वर्षीय परीक्षेत मोबाईल घेऊन बसला होता. दुपारी २:२७ च्या सुमारास पर्यवेक्षक मनीष बानबले यांनी त्याला मोबाईलसह पकडले. परीक्षेची वेळ संपल्यानंतर मोबाईलची तपासणी केली असता, गॅलरीमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्याने एआयला प्रश्न पाठवून उत्तरे मिळवल्याचे चॅटिंगवरून स्पष्ट झाले आहे.
कडक तपासणीनंतरही मोबाईल आत कसा?
'नीट' परीक्षेसाठी चप्पल, दागिने, केसांच्या पिना अशा साध्या वस्तूंनाही मनाई असताना, हे विद्यार्थी मोबाईल घेऊन आत शिरलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे केंद्रावरील तपासणी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणी केंद्रप्रमुख राजकुमार नंदागवळी आणि अरुण मुनघाडे यांनी गडचिरोली ठाण्यात तक्रार दिली . पोलिसांनी नवीन 'सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४' मधील कलम ३ (viii) आणि इतर कलमान्वये दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत. जप्त केलेले मोबाईल आणि चित्रीकरण पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सहायक अधीक्षक अनिकेत हिरडे हे करत आहेत.