आलापल्लीत महिलेचा घरातच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST2021-06-01T04:27:44+5:302021-06-01T04:27:44+5:30

ही घटना वेलगूर मार्गावरील वॉर्ड क्रमांक २ मधील एका घरात घडली. सोमवारी त्या घरातून दुर्गंधी येणे सुरू झाल्यानंतर या ...

Murder of a woman at home in Alapally | आलापल्लीत महिलेचा घरातच खून

आलापल्लीत महिलेचा घरातच खून

ही घटना वेलगूर मार्गावरील वॉर्ड क्रमांक २ मधील एका घरात घडली. सोमवारी त्या घरातून दुर्गंधी येणे सुरू झाल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. यावरून हा खून आधीच झाला असल्याचे दिसून येत आहे. मृत महिलेचे नाव सुशीला गॊपीचंद मडावी (४५ वर्ष) असे आहे.

येथील वेलगूर मार्गावरील वॉर्ड क्रमांक २ मध्ये भेडके यांच्या घरी सुशीला व गोपीचंद मडावी हे दाम्पत्य राहात होते. मूळचे भामरागड तालुक्यातील कोठी येथील गॊपीचंद मडावी (५५ वर्षे) मागील दोन महिन्यांपासून येथे भाड्याने राहात होते. मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी शेजारच्या लोकांना त्या घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी आत डोकावून बघितले असता ती महिला मृतावस्थेत पडलेली आढळली.

शेजारच्या लोकांनी लगेच अहेरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

(बॉक्स)

पोलिसांचा संशय पतीवर

सदर महिलेच्या खुनाचा संशय तिचा पती गोपीचंद याच्यावरच असल्याने त्याचा शोध अहेरी पोलीस घेत आहेत. अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतल्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी योग्य ते निर्देश दिले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे व पोलीस कर्मचारी करत आहेत.

Web Title: Murder of a woman at home in Alapally