भामरागडात दर तीन महिन्यांत पोहोचणार खासदार

By Admin | Updated: July 21, 2015 02:32 IST2015-07-21T02:32:27+5:302015-07-21T02:32:27+5:30

राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका मात्र विकासाच्या बाबत जिल्ह्यात सर्वात मागे असलेल्या भामरागडला दहा वर्षांहून

MP from Bahamargad will reach every three months | भामरागडात दर तीन महिन्यांत पोहोचणार खासदार

भामरागडात दर तीन महिन्यांत पोहोचणार खासदार

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेला तालुका मात्र विकासाच्या बाबत जिल्ह्यात सर्वात मागे असलेल्या भामरागडला दहा वर्षांहून अधिक कालावधीनंतर शनिवारी खा. अशोक नेते यांनी भेट दिली. यावेळी तेथील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला व यापुढे दर तीन महिन्यांत भामरागडला आपली भेट राहील व येथील विकास कामांचा आढावा आपण स्वत: अधिकाऱ्यांकडून घेऊ, असे आश्वासन देऊन खासदार तेथून परतले.
माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नंतर भामरागडला भेट देणारे अशोक नेते हे दुसरे खासदार ठरले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर मागील सहा वर्षानंतर भामरागडला खासदार गेलेच नव्हते. खा. नेते यांनी भामरागड येथे पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार अरूण येरचे, संवर्ग विकास अधिकारी सज्जनपवार, पंचायत समिती सभापती रंजना उईके, उपसभापती मालू मडावी, पं. स. सदस्य भांडेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, राजू तिर्थगिरीवार आदी उपस्थित होते.
यावेळी खासदारांनी भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती अधिकारी वर्गाकडून जाणून घेतली. दर तीन महिन्याला भामरागड येथे आढावा बैठक घेऊन कामाची प्रगती जाणून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. रस्ता, आरोग्य, शिक्षण, कृषी, पाणीपुरवठा, मूलभूत सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांच्या विकासाचे नियोजन करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शेती विकासासाठी चार मोठे बंधारे मंजूर करून घेतले जातील, औद्योगिक विकासासाठी गडचिरोली-मंचेरीयल रेल्वे लाईन मंजूर केली जाईल. गडचिरोली व तेलंगणा राज्याला जोडणारा मार्ग तयार करण्यासाठी नियोजन पूर्ण झाले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती खासदारांनी दिली. संचालन संवर्ग विकास अधिकारी सज्जनपवार यांनी केले. आढावा बैठकीला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: MP from Bahamargad will reach every three months