नाल्यावर ठेवलेल्या दुचाकींची हानी

By Admin | Updated: September 16, 2016 01:55 IST2016-09-16T01:55:28+5:302016-09-16T01:55:28+5:30

हालेवारा-वट्टेगट्टा दरम्यानच्या झुरी नाल्यावर पूर असल्याने तीन दुचाकी वाहने नाल्याच्या पलिकडेच

Loss of two wheelers placed on the net | नाल्यावर ठेवलेल्या दुचाकींची हानी

नाल्यावर ठेवलेल्या दुचाकींची हानी

एटापल्ली : हालेवारा-वट्टेगट्टा दरम्यानच्या झुरी नाल्यावर पूर असल्याने तीन दुचाकी वाहने नाल्याच्या पलिकडेच ठेवण्यात आली होती. यापैकी एका दुचाकीची चोरी झाली. दुसरी दुचाकी नाल्यात फेकण्यात आली. तर तिसऱ्या दुचाकीची तोडफोड करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली.
हालेवारावरून वट्टेगट्टाला जाताना वट्टेगट्टा गावापासून अर्धा किमी अंतरावर अलिकडे झुरी नाला पडतो. या नाल्याला लागूनच सिमेंटचा रपटा आहे. मात्र या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने दुचाकीस्वारांनी आपल्या दुचाकी नाल्याच्या अलिकडेच ठेवल्या होत्या. पाणी कमी झाल्यानंतर दुचाकी गावाकडे आणणे ही नेहमीचीच बाब झाली होती. परंतु असे करणे मंगळवारी महागात पडले. वट्टेगट्टा येथील मारोती नरोटे, प्रवीण गेडाम व गट्टेपल्ली येथील एक इसम या तिघांचे वाहन नाल्यापलिकडे ठेवून हे तिघेही गावाकडे पायी गेले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुचाकी गावाकडे आणण्यासाठी नाल्याकडे गेले असता, मारोती नरोटे या इसमाची दुचाकी चोरीला गेली होती. प्रवीण गेडाम यांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली होती. तर इतर एका इसमाची दुचाकी नाल्यात फेकली असल्याचे आढळून आले. वर्षानुवर्षे नाल्यापलिकडे दुचाकी ठेवून वट्टेगट्टा येथील नागरिक पायी प्रवास करतात. मात्र पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. त्यामुळे दुचाकीमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची तक्रार वट्टेगट्टाचे पोलीस पाटील चंदू नरोटे व गावकऱ्यांनी बुधवारी हालेवारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Loss of two wheelers placed on the net