रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रशासनाचाच खो

By Admin | Updated: June 26, 2015 00:12 IST2015-06-26T00:12:50+5:302015-06-26T00:12:50+5:30

भूजल पातळीत वाढ होण्यासाठी प्रत्येक शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविणे शासनाच्या वतीने ....

Lose the administration of Rainwater Harvesting | रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रशासनाचाच खो

रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रशासनाचाच खो

दिगांबर जवादे गडचिरोली
भूजल पातळीत वाढ होण्यासाठी प्रत्येक शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविणे शासनाच्या वतीने सक्तीचे करण्यात आले असले तरी गडचिरोली जिल्ह्यातील एकाही प्रशासकीय इमारतीवर सद्य:स्थिती रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा अस्तित्वात नसल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. यावरून दस्तुरखुद्द प्रशासनच शासनाच्या नियमांना खो देत असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात हजारो मिली पाऊस पडते. मात्र पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने सदर पाणी नदी, नाले यांच्या माध्यमातून वाहून जाते. त्याचबरोबर पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्त हानी सुध्दा होते. उन्हाळ्यात मात्र तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊन घागरभर पाण्यासाठी दोन ते तीन किमीचा प्रवास करावा लागतो. ही विपरित परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा प्रत्येक प्रशासकीय इमारतीवर बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला.
या निर्णयानुसार प्रत्येक प्रशासकीय कार्यालयावर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही यंत्रणा बसविल्याशिवाय नवीन इमारतीला परवानगीच देऊ नये, असे निर्देश नगर रचना खात्याला देण्यात आले आहेत. तसेच याबाबतच्या सूचना भूवैज्ञानिक कार्यालयालाही देण्यात आल्या आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकाही इमारतीवर ही यंत्रणा अस्तित्वात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. प्रशासकीय यंत्रणाच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम लावत नसेल तर इतर नागरिक कशी काय स्वत:च्या इमारतीला ही यंत्रणा लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराकडे शासनाने लक्ष घालून प्रत्येक प्रशासकीय इमारतीवर अशा प्रकारची यंत्रणा लावण्याचे सक्त निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Lose the administration of Rainwater Harvesting