शेतीचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: June 24, 2015 02:33 IST2015-06-24T02:33:38+5:302015-06-24T02:33:38+5:30

कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फतीने जी प्रात्याक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात येतात.

Extend farm demonstrations to farmers | शेतीचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

शेतीचे प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

शास्त्रीय सल्लागार समितीची सभा : पी. जी. इंगोले यांचे प्रतिपादन
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फतीने जी प्रात्याक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर करण्यात येतात. ती प्रात्याक्षिके प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले.
स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात शास्त्रीय सल्लागार समितीची सभा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विनोद गुळदेकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे, कृषी अधिकारी कार्यालयाचे डॉ. सोनटक्के, योगिता सानप, संदीप कऱ्हाडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुर्यवंशी, सल्लागार समितीचे सदस्य चंद्रशेखर भडांगे, बाबुराव सारवे, विद्या मांडवे, यांच्यासह इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
सभेदरम्यान डॉ. एस. पी. लांबे, योगिता सानप व संदीप कऱ्हाळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील कृषीचे उत्पादन वाढावे यासाठी कोणते प्रयत्न मागील दोन वर्षांत करण्यात आले. त्याचबरोबर पुढील वर्षी कोणते कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. याबद्दलची माहिती सभेदरम्यान सादर केली.
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांची डॉ. इंगोले यांनी कौतुक केले. मात्र जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रयत्न करावा, असे आवाहन केले. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर प्रात्याक्षिक करीत असताना सभोवतालच्या गावातील शेतकऱ्यांनाही बोलाविण्यात यावे. त्यामुळे त्या प्रात्याक्षिकाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळून ते त्याचा वापर करू शकतील. गडचिरोली जिल्ह्यातील जांभुळ संपूर्ण विदर्भात प्रसिध्द आहे. या जांभळात औषधी गुणधर्म आहे. त्यामुळे जांभळाचे ज्युस नागरिक वर्षभर वापरतात. जांभळाचे ज्युस वर्षभर प्राप्त होईल, अशी व्यवस्था करावी. त्यामुळे स्थायी रोजगार महिला बचत गटाच्या सदस्यांना प्राप्त होईल, असे मार्गदर्शन केले. संचालन संदीप कऱ्हाळे तर आभार प्राध्यापक योगिता सानप यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Extend farm demonstrations to farmers