सुकाळ्याचा खोदतलाव फुटला

By Admin | Updated: May 27, 2015 01:43 IST2015-05-27T01:43:44+5:302015-05-27T01:43:44+5:30

जिल्हा वार्षिक योजनेतून वन्य पशुसंवर्धन निसर्ग संरक्षण योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात वडसा वन विभागात उपक्षेत्र वैरागड नियत क्षेत्र सुकाळा येथे ...

The excavated excavated cove | सुकाळ्याचा खोदतलाव फुटला

सुकाळ्याचा खोदतलाव फुटला

नैसर्गिक स्रोत आटले : वन्यप्राण्यांची लोकवस्तीकडे धाव
वैरागड : जिल्हा वार्षिक योजनेतून वन्य पशुसंवर्धन निसर्ग संरक्षण योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात वडसा वन विभागात उपक्षेत्र वैरागड नियत क्षेत्र सुकाळा येथे कक्ष क्र. ४५ मध्ये वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात तहाण भागविण्यासाठी खोदतळी बांधण्यात आली. पण १० दिवसांपूर्वी झालेल्या अकाली पावसामुळे हे खोदतळे बुजून गेले आहे.
या खोदतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याला जागोजागी तडा गेल्या आहे. सभोवताल लावण्यात आलेले दगडाचे बांधही निघून गेले आहे. यात पाणी साठवणे कठीण झाले आहे. मे महिन्याच्या प्रारंभापासून वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले असून वन विभागाने तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यातदेखील पाण्याचा ठणठणात असल्यामुळे तहानलेले वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. त्यातून ठिकठिकाणी प्राण्यांच्या शिकारीचा डाव साधल्या जात आहे.
आरमोरी तालुक्यातील शिवणीच्या बांधावर रात्री तहान भागविण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांवर सापळे रचून शिकारीच्या घटना होत आहेत. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. तेंदू गोळा करणाऱ्या लोकांची जंगलात चौफेर गर्दी सुरू झाली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी भयभीत झाले असून मोकळ्या जागांकडे किंवा गावांकडे त्यांची धाव वाढली आहे. यातूनच प्राण्यांची शिकार होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.
येत्या काही दिवसात बदल्यांचा सत्र वन विभागात सुरू होणार असल्याने अनेक अधिकारी, कर्मचारी याच कामात गुंतलेले आहेत. (वार्ताहर)


 

Web Title: The excavated excavated cove