मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची भाजपकडून सोशल मीडियावर धूम

By Admin | Updated: July 25, 2015 02:02 IST2015-07-25T02:02:55+5:302015-07-25T02:02:55+5:30

काँग्रेसवर कुरघोडीचा प्रयत्न : मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमनांचा गौरव

Dhoom by the BJP on social media for the Chief Minister's speech | मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची भाजपकडून सोशल मीडियावर धूम

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची भाजपकडून सोशल मीडियावर धूम

गडचिरोली : विधिमंडळाच्या अधिवेशनातील पहिल्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज विरोधकांनी रोखून धरले होते. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर सभागृहात निवेदन केले. या निवेदनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाच्या क्लिपिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाकडून गावागावात पाठविल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देऊन गप्प केल्याचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत.
महाराष्ट्रात मागील एक वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झाल्या. दरदिवशी आठ आत्महत्या झाल्याचा अहवाल राष्ट्रीयस्तरावरील संस्थेने नुकताच जाहीर केला आहे. राज्यात खरीपाची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारला याच मुद्यावर सुरुवातीचे दोन दिवस रोखून धरले होते. कामकाजही ठप्प झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोमवारी अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तास निवेदन केले. राज्यभरात विविध दृकश्राव्य माध्यमांनी मुख्यमंत्र्यांचे हे भाषण थेट दाखविले.
भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील विविध क्लिपिंग पाठविण्याची धूम चालविली आहे. विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांना उद्देशुनही मुख्यमंत्र्यांनी काही वक्तव्य केलीत. या वक्तव्यासंदर्भातील क्लिपिंग पूर्व व पश्चिम विदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे.
भाजपने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा जोरदार वापर करून सत्ता मिळविली. त्यानंतर सत्तेवर येताच अनेक आश्वासनांचा सरकारला विसर पडला. असे असतानाही पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील भाषणाच्या क्लिपिंग सोशल मीडियावर वापल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याबाबत आघाडीवर असून या माध्यमातून विरोधकांच्या मर्मावर मुख्यमंत्र्यांनी कसे बोट ठेवले, हे ही सांगितले जात आहे.
विदर्भाच्या या सुपुत्राला अभिनंदनही काही अतिउत्साही भाजप नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्यामुळे भाजपचा आतातायीपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Dhoom by the BJP on social media for the Chief Minister's speech