Destruction of Mohaful rotten in the forest of Vihirgaon | विहीरगावच्या जंगलातील मोहफूल सडवा नष्ट
विहीरगावच्या जंगलातील मोहफूल सडवा नष्ट

ठळक मुद्देमहिलांची कारवाई । १४ ड्रम व ५ मडकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील सिर्सी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या विहीरगाव नजीकच्या जंगलात लपवून असलेला जवळपास एक लाखाचा मोहफूल सडवा विहीरगावच्या महिलांनी नष्ट केला. या मोहसडव्याचे १४ ड्रम आणि ५ मडके बाहेर काढून नष्ट करण्यात आले.
सिर्सी या ग्रामपंचायतअंतर्गत आठ गावे येतात. यातील नरोटी माल, नरोटी चक आणि गणेशपूर (२) या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. पण विहीरगाव, कुकडी, मोहटोला, गणेशपूर (१) व सिर्सी या गावांमध्ये दारूविक्री होत आहे. विशेष म्हणजे विहीरगावपासून काही अंतरावर असलेल्या कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावांमध्ये गाव संघटनांनी दारूविक्री बंद केली आहे. पण येथील तब्बल १० विक्रेत्यांनी विहीरगावच्या जंगलात दारू गाळण्याचे अड्डे सुरू केले आहेत. येथून आसपासच्या गावांमध्ये नेऊन दारू विकली जात आहे. याचा त्रास विहीरगावच्या लोकांना होतो.
काही दिवसांपूर्वी विहीरगाव येथे मुक्तिपथ गाव संघटन पुनर्गठीत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान दामदुप्पट दराने दारूची विक्री करता येते. याचा फायदा उचलण्यासाठी विहीरगाव परिसरातील दारूविक्रेत्यांनी दारू काढण्यास सुरूवात केली. गावाजवळच दारू मिळत असल्याने आणि त्यातच निवडणुकीचे वातावरण असल्याने दारू पिणाऱ्यांची संख्या वाढून गावातील शांतता धोक्यात आली होती. गावातील महिलांनी एकत्र येत जंगलात जाऊन दारू अड्डा शोधला. नाल्याजवळ सडवा भरलेले १४ ड्रम व ५ मडके जमिनीत पुरून ठेवले असल्याचे दिसून आले. हा संपूर्ण सडवा तसेच दारू गाळण्याचे साहित्य नष्ट केले. ही कारवाई झाल्यामुळे गावात आता दारूमुक्त निवडणूक होण्यास मदत होणार आहे.


Web Title: Destruction of Mohaful rotten in the forest of Vihirgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.