धान विक्रीसाठी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:41+5:30

धानोरा येथील खरेदी केद्रावर १३ फेब्रुवारीपर्यंत ६ हजार २०० क्विंटल धान खरेदी झाली होती. परंतु गोडावून भरल्याने खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान खरेदी केंद्राच्या आवारात आणून टाकला होता. तर काहींनी आपल्या घरीच साठा करून ठेवला होता. खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती.

Crowds at the center for the sale of paddy | धान विक्रीसाठी केंद्रावर गर्दी

धान विक्रीसाठी केंद्रावर गर्दी

Next
ठळक मुद्देधानोरा तालुक्यातील शेतकरी त्रस्त : काटा करण्यास होताहे विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येथील आदिवासी सोसायटीच्या धान खरेदी केंद्रामार्फत धानाची खरेदी केली जात आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रचंड उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी धान विक्रीसाठी केंद्रावर आणत आहेत. धानोरा येथील खरेदी केंद्र गोडावून भरल्याने बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. परंतु धानाचा काटा करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
धानोरा येथील खरेदी केद्रावर १३ फेब्रुवारीपर्यंत ६ हजार २०० क्विंटल धान खरेदी झाली होती. परंतु गोडावून भरल्याने खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान खरेदी केंद्राच्या आवारात आणून टाकला होता. तर काहींनी आपल्या घरीच साठा करून ठेवला होता. खरेदी बंद पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. अखेर शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन केंद्र सुरू करण्याची मागणी केली. तेव्हा तहसीलदारांनीही आपण काहीच करू शकत नाही, असे सांगितले होते. शेवटी महामंडळाचे व्यवस्थापक चौधरी यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन खरेदी सुरू करण्याची विनंती केली. तेव्हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये धान खरेदी सुरू करण्याचे ठरविण्यात आले. अखेर १८ फेब्रुवारीपासून धान खरेदी पुन्हा सुरू झाली. येथील केंद्रावर नगर पंचायत व हेटी, तुकूम, सालेभट्टी, चव्हेला या ग्राम पंचायतीसह १७ गावातील शेतकऱ्यांनी धान आणून टाकला आहे.

कमी हमालांमुळे अडचण
खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने आपला नंबर लागावा म्हणून शेतकऱ्यांमध्ये चढाओढ आहे. यासाठी प्रत्येक ग्रा. पं. मधील शेतकऱ्यांना दोन दिवस ठरवून देण्यात आले आहेत. ठराविक दिवशी सदर ग्राम पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानाचा काटा केला जात आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. परंतु हमालांची संख्या कमी असल्याने काटा वेळेवर होत नाही. या केंद्रावरील धानाची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यांना धान काटा लवकर होण्याची प्रतीक्षा आहे.

Web Title: Crowds at the center for the sale of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.