निराधार योजनेची ५७ प्रकरणे मंजूर
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:48+5:302016-01-02T08:34:48+5:30
स्थानिक तहसील कार्यालयात मंगळवारी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता समितीची बैठक पार

निराधार योजनेची ५७ प्रकरणे मंजूर
आरमोरी : स्थानिक तहसील कार्यालयात मंगळवारी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातून प्राप्त एकूण १२४ प्रकरणांपैकी ५७ प्रकरणे मंजूर करण्यात आली. १० प्रकरणे नामंजूर तर ५७ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली.
निराधार वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी महिला, अनाथ बालके आदींचे जीवनमान सुसह्य करण्याकरिता शासनाकडून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. याकरिता तालुक्यात अनेक गावांमध्ये शिबिरे आयोजित करून लाभार्थ्यांचे अर्ज विहित नमुन्यात भरून घेण्यात आले.
आरमोरी तालुक्यातून एकूण १२४ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ३२, यापैकी १३ मंजूर, १ नामंजूर, १८ प्रलंबित ठेवण्यात आले. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या (बीपीएल) एकूण २५ प्रकरणांपैकी १२ मंजूर, १ नामंजूर, १२ प्रलंबित ठेवण्यात आले. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची (नॉन बीपीएल) एकूण ५७ प्रकरणांपैकी ३१ मंजूर, ६ नामंजूर व २० प्रलंबित ठेवण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या १० प्रकरणांपैकी १ मंजूर, २ नामंजूर व ७ प्रलंबित ठेवण्यात आली. बैठकीत एकूण १२४ प्रकरणांपैकी ५७ मंजूर, १० नामंजूर, ५७ प्रलंबित ठेवण्यात आले. शिबिरांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करण्यात आले.
यावेळी तहसीलदार एम. टी. वलथरे, नायब तहसीलदार डी. एस. नैताम, हेमलता मसराम, प्रशांत लांडगे, विश्रांती बागडे, गंगाधर ठाकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)