आधारसाठी ४१ स्थायी केंद्र

By Admin | Updated: August 29, 2016 02:19 IST2016-08-29T02:19:17+5:302016-08-29T02:19:17+5:30

आधार नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिर घेण्याबरोबरच तालुकास्थरावर स्थायी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

41 Standing centers for support | आधारसाठी ४१ स्थायी केंद्र

आधारसाठी ४१ स्थायी केंद्र

नागरिकांसाठी सोयीचे : ग्रामीण भागात विशेष शिबिरांचे आयोजन
गडचिरोली : आधार नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिर घेण्याबरोबरच तालुकास्थरावर स्थायी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हाभरात एकूण ४१ स्थायी केंद्र निर्माण करण्यात आले आहेत.
२०११ च्या जनगणेनुसार गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १० लाख ३८ हजार ६२८ एवढी आहे. यापैकी जवळपास ९५ टक्के नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. तरीही जवळपास पाच टक्के नागरिकांनी आधारकार्ड अजूनपर्यंत निघालेले नाही. दुर्गम भागातील अनेक नागरिक आधारकार्ड काढण्यासाठी शिबिरात सुद्धा येत नाही. त्यामुळे या नागरिकांचे आधारकार्ड अजूनपर्यंत निघाले नाही. तर काही गावांमध्ये आधारकार्ड काढण्याचे शिबिर सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या गावांमधील नागरिक अजूनही आधारकार्डपासून वंचित असल्याचे दिसून येते. प्रत्येक योजनेसाठी आधारकार्ड सक्तीचा करण्यात आला असल्याने प्रत्येक नागरिकाकडे आधारकार्ड असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून आधारकार्ड काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला सहा वर्षांखालील बालकांचे आधारकार्ड काढले जात नव्हते. आता मात्र याही मुलांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे.
१५ मार्च २०१६ च्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील १ लाख १ हजार ९४० बालके आहेत. त्यापैकी ९१ हजार १६६ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. आधारकार्ड काढण्याचे प्रमाण ८९.४३ टक्के एवढे आहे. शाळा, महाविद्यालय सुरू झाले आहेत. अंगणवाडीत शिकणारे विद्यार्थी, आश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी व २५ टक्के प्रवेशित विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर सदर आधारकार्ड काढण्याच्या कामाला आणखी वेग आला आहे. मात्र याच कालावधीत आणखी काही मुलांची भर पडली असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 41 Standing centers for support