चारचाकी वाहनासह २ लाख ५७ हजारांची दारू जप्त

By Admin | Updated: July 21, 2015 02:22 IST2015-07-21T02:22:14+5:302015-07-21T02:22:14+5:30

१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विशेष

2 lakh 57 thousand liquor seized with four wheelers | चारचाकी वाहनासह २ लाख ५७ हजारांची दारू जप्त

चारचाकी वाहनासह २ लाख ५७ हजारांची दारू जप्त

गडचिरोली : १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विशेष पथकाची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी केली. या पथकाकडून मागील चार महिन्यांपासून दारू विक्रेत्यांविरोधात शहरी व ग्रामीण भागात धडक कारवाई केली जात आहे. या कारवाई अंतर्गत रविवार व सोमवारी गडचिरोली व देसाईगंज शहरात चार आरोपींकडून चारचाकी वाहनासह २ लाख ५७ हजार १६० रूपयांची दारू जप्त करण्यात आली. गडचिरोली पोलीस ठाण्यांतर्गत हनुमान वार्ड भागात नामदेव दयाराम भांडेकर, माधुरी भांडेकर, रवी धोडरे यांच्याकडून २० हजार रूपयांची देशी, २ हजार ३६० रूपयांची दारू विक्रीची रोख रक्कम असा एकूण २२ हजार ३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रवी धोडरे हा आरोप फरार झाला असून अन्य दोन आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तर देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० जुलै रोजी पोलिसांनी नितीन विश्वमित्र शर्मा, केशोरी येथील दारू दुकानाचा मालक सचिन घाटबांधे या दोघांकडून चारचाकी वाहनासह २ लाख ३४ हजार ८०० रूपयांची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून देसाईगंज मार्ग मोठ्या प्रमाणावर दारूसाठा आणला जात आहे. येथून चंद्रपूर जिल्ह्यातही दारूचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे यापूर्वीही गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने या भागात आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर दारू जप्त केली आहे. गडचिरोली पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक ग्रामीण भागातही धाडी घालत आहे.

Web Title: 2 lakh 57 thousand liquor seized with four wheelers