१५ कोटींची कामे पडली लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:36+5:30

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी लागू झाली. आचारसंहितेमध्ये नवीन कामांचा शुभारंभ करता येत नाही. तसेच कुठल्याही देयकाला मंजुरी प्रदान करता येत नाही. गडचिरोली पालिका प्रशासनाला शासकीय निधी प्राप्त झाल्यानंतर त्यातून सिमेंट काँक्रीट रस्ते, डांबरी रस्ते, नाली व मोरी बांधकाम, छोटे पूल, प्रसाधानगृह व इतर कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

15 crores of work has been delayed | १५ कोटींची कामे पडली लांबणीवर

१५ कोटींची कामे पडली लांबणीवर

Next
ठळक मुद्देआचारसंहितेत अडकली : कार्यारंभ आदेशानंतरही बंदच

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सन २०१९-२० या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत विविध योजनेतून प्राप्त निधीमधून एकूण ८९ कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले. यापैकी १० कोटींची ५५ कामे सुरू आहे. मात्र नियोजनाअभावी १५ कोटींची ३४ कामे सुरूच न झाल्याने ही कामे आता लांबणीवर पडली आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी लागू झाली. आचारसंहितेमध्ये नवीन कामांचा शुभारंभ करता येत नाही. तसेच कुठल्याही देयकाला मंजुरी प्रदान करता येत नाही. गडचिरोली पालिका प्रशासनाला शासकीय निधी प्राप्त झाल्यानंतर त्यातून सिमेंट काँक्रीट रस्ते, डांबरी रस्ते, नाली व मोरी बांधकाम, छोटे पूल, प्रसाधानगृह व इतर कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डात दरवर्षी विविध योजनेतून विकासकामे केली जातात. पण यावर्षीच्या कामांचे नियोजनही वेळेवर झाले नाही.
नगर परिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी (ठोक तरतूद अंतर्गत) १५ कोटी रुपयातून ३५ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी ३४ कामांचा कार्यारंभ आदेश काढण्यात आला, मात्र ३४ कामांना सुरूवातच झाली नाही. मध्यंतरीच्या काळात रेतीचा तुटवडा होता. रेतीअभावी सिमेंट काँक्रीटीकरण रस्ते, नाली बांधकामे प्रभावित झाली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाच्या वतीने इतर कार्यवाहीसाठी दिरंगाई झाली. त्यामुळे नंतर रेतीघाटांचे लिलाव झाले तरी प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊ शकली नाही.
आता २१ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू होण्याची चाहुल लागल्याने पालिका प्रशासनाच्या वतीने लगबगीने कार्यवाही करून कोट्यवधी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले. परंतू ती कामे प्रत्यक्षात सुरूच झाली नाही. आता आचारसंहिता संपल्यावरच ती कामे सुरू होतील, असे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी सांगितले.

१५ दिवसात १५ कामांचे आदेश
नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी व नाविन्यपूर्ण योजनेतून गडचिरोली नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी १५ दिवसांत १५ कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यात आले. यातील अर्धी कामे सुरू झाली असून काही कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनामध्ये समन्वय नसल्याने कामास दिरंगाई झाली होती.

शहरवासीयांचे हाल कायम
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २४ ऑक्टोबरपर्यंत लागू असली तरी इतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आॅक्टोबर महिना पूर्ण उलटणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच शहरातील कामांची गती वाढण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांना अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: 15 crores of work has been delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.