ओझीलच्या रुपात पहिले ‘रेड कार्ड’; राजीनामा ही जर्मनीच्या संघ बदलाची सुरूवात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 04:57 PM2018-07-24T16:57:08+5:302018-07-24T16:57:39+5:30

हा ओझिलने स्वत:हून घेतलेला निर्णय आहे की, त्याच्या निमित्ताने हे पहिले ‘रेड कार्ड’ देण्यात आले असून आता आणखी अशा किती कार्ड्ची रिघ लागते, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

The first 'Red Card' ; Germany is the beginning of change! | ओझीलच्या रुपात पहिले ‘रेड कार्ड’; राजीनामा ही जर्मनीच्या संघ बदलाची सुरूवात!

ओझीलच्या रुपात पहिले ‘रेड कार्ड’; राजीनामा ही जर्मनीच्या संघ बदलाची सुरूवात!

Next
ठळक मुद्देदक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात गोल करण्याच्या चांगल्या संधी गमावलेला मॅट्स ह्युमेल्स यांना राष्ट्रीय संघाला रामराम ठोकावा लागण्याची शक्यता आहे.

चिन्मय काळे : जर्मन फुटबॉल संघाचा लोकप्रिय मीडफिल्डर मेसुट ओझिल याने वर्णभेदी टीकांनी नाराज होऊन आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून सन्यास घेतला. मुळात जर्मनीच्या विश्वचषकातील मानहानीकारक पराभवानंतर संघात आमुलाग्र बदल होणार, हे नक्की होते. त्यामुळे हा ओझिलने स्वत:हून घेतलेला निर्णय आहे की, त्याच्या निमित्ताने हे पहिले ‘रेड कार्ड’ देण्यात आले असून आता आणखी अशा किती कार्ड्ची रिघ लागते, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

जर्मनीची विश्वचषक इतिहासातील सर्वात खराब कामगिरी यंदा रशियात झाली. दक्षिण कोरियाविरुद्धच्या निर्णायक सामन्यात महत्त्वाच्या खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे संघाने कच खाल्ली. 
‘अनुभवी मीडफिल्डर सामी खेदीरा आणि मेसुट ओझिल, हे दोघे या परभवाचे मुख्य गुन्हेगार आहेत’, असे स्पष्ट मत ज्येष्ठ गोलरक्षक आॅलिव्हर कान्ह याने सामन्यानंतर लगेच व्यक्त केले होते. ‘संघाच्या कामगिरीत उतार-चढाव येतच असतात. पण हा पराभव अनपेक्षित होता. त्याची परिणीती संघातील बदलाने होईल व ती येत्या काळात दिसेलच’, असे सांकेतिक भाष्य विश्वचषक संघाचा माजी कर्णधार फिलिप ल्हाम यानेही व्यक्त केले होते. याखेरीज जर्मन क्रीडा पत्रकारांनीसुद्धा ‘संघ बदल’ हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले होते. त्यानुसार मूळ तुर्किश असलेल्या ओझिलची एक्झिट पहिली ठरली आहे.
तुर्कस्थानच्या अध्यक्षांसह लंडनमध्ये फोटो काढणे, हे ओझिलच्या निवृत्तीचे निमित्त ठरले आहे. स्पर्धेतील खराब कामगिरीबद्दल आधीच तो लक्ष्यावर असताना या फोटोमुळे वर्णद्वेषी टीका झाली. त्यातून त्याने जर्मनी सोडले. पण ओझिलची ही ‘एक्झिट’ एक सुरुवात असेल तर आता दुसरा क्रमांक कुणाचा आणि अशा किती जणांना जर्मन संघाला बाय-बाय करावा लागणार आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
स्पर्धेतील कामगिरीवरुन ओझिलपाठोपाठ सर्वाधिक टीका झाली ती, खेदीरावर. यामुळे पुढली विकेट ही खेदीराची असेल, असे चित्र आहे. त्यापाठोपाठ ३३ वर्षीय स्ट्रायकर मारिओ गोमेझ, अत्यंत वलयांकित असूनही खराब कामगिरी केलेला गोलरक्षक कर्णधार मॅन्युअल न्युअर, दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात गोल करण्याच्या चांगल्या संधी गमावलेला मॅट्स ह्युमेल्स यांना राष्ट्रीय संघाला रामराम ठोकावा लागण्याची शक्यता आहे.
वास्तवात अनुभवी व लोकप्रिय खेळाडू थॉमस मूलरबाबतही जर्मनीत नाराजी आहे. पण मूलर हा प्रशिक्षक ज्योकिम लो यांच्या खास विश्वासातील आहे. तसेच त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे वलय आहे. त्यामुळे मूलरला २०२० च्या युरो चषकापर्यंत एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. एकूणच ओझीलचा ‘राजिनामा’ हा आता जर्मन फुटबॉल संघाच्या बदलांची सुरूवात ठरण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: The first 'Red Card' ; Germany is the beginning of change!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.