सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:27 IST2026-05-10T14:21:42+5:302026-05-10T14:27:37+5:30
सोमनाथ मंदिर केवळ एक प्राचीन मंदिर नसून भारताच्या अभेद्य संस्कृतीचे आणि धैर्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. महाराष्ट्राशी त्याचे नाते अनेक वर्षांपासूनचे आहे. हे ज्योतिर्लिंग केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर आक्रमण, पुनर्बाधणी, आत्मसन्मान, राज्यकारभार आणि राष्ट्रीय पुनर्जागरणाचा इतिहास आणि वर्तमान त्याला आहे. २०२६मध्ये आपण साजरे करीत असलेले 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' हे या प्रवासाला नव्या पिढीसमोर आत्मविश्वासाने, अभिमानाने आणि संतुलित भावनेने मांडणारा वळणबिंदू आहे.

सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
-देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर मोहम्मद गझनीने १०२६ मध्ये सर्वप्रथम आक्रमण केले. हे आक्रमण धर्मयुद्ध तर होतेच, पण ती व्यापारमार्ग आणि सोमनाथमध्ये असलेल्या संपत्तीवर लक्ष केंद्रीत करणारी आक्रमक कारवाई सुद्धा होती.
सोमनाथावर झालेल्या प्रत्येक आक्रमणानंतर स्थानिक समाज, व्यापारी, साधू-संत, नंतर मराठा व पुढे स्वातंत्र्योत्तर नेतृत्व, कोणी ना कोणी नव्याने उभे राहिले आणि सोमनाथाचे संरक्षण केले. सोमनाथचा इतिहास प्रतिकार आणि पुनरुत्थान दोन्हींचा एकत्रित इतिहास आहे.
सोमनाथ आणि महाराष्ट्राचे नाते भूगोलाने नव्हे, तर इतिहासाने जोडलेले आहे. मराठा साम्राज्याचा सोमनाथशी संबंध सांस्कृतिक, आर्थिक आणि सामरिक या तीन स्तरांवर आहे. सांस्कृतिक स्तरावर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा सर्वात मोठा अध्याय. इंदूरच्या होळकर घराण्याची ही राणी, जी महाराष्ट्रातील मराठा राजवटीचा भाग होती, त्यांनी १७८३ मध्ये सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला.
भग्नावस्थेतील हे मंदिर त्यांनी पुन्हा उभे केले. समुद्राच्या लाटांच्या धक्क्यांपासून, तसेच भविष्यातील नौदल गोळीबारापासून संरक्षण मिळावे, म्हणून नवीन मंदिर थोडे आतल्या बाजूला उभे केले. हा निर्णय फक्त श्रद्धा म्हणून न बघता राज्यकारभारातील 'स्पेशल इंटेलिजन्स' म्हणून पाहिला तर अहिल्यादेवी होळकर यांचे दूरदर्शी नेतृत्व दिसून येते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ सोमनाथचेच पुनरुज्जीवन केले असे नाही तर काशी विश्वनाथाचे पुनरुज्जीवन, गया येथे घडवलेली कामे, द्वारकेतील मंदिरांचे सुशोभीकरण देखील त्यांनी केले. तडे गेलेली सभ्यता पुन्हा उभी केली. होळकर-शिंदे-भोसले अशा सरदारांची भूमिका यात महत्त्वाची होती. सोमनाथ हा त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा एक महत्त्वाचा उपक्रम होता. आर्थिक स्तरावर, मराठ्यांनी सोमनाथ-वेरावल परिसराला तीर्थक्षेत्र म्हणूनच नव्हे, तर महसुली मालमत्ता म्हणूनही समजून घेतले. त्यामुळे सोमनाथच्या सुरक्षेवर खर्च करणे, किल्ले-ठाणी व रक्षक ठेवणे हे मराठा सत्तेसाठी भावनिकच नव्हे, आर्थिकदृष्ट्याही योग्य होते.
सामरिक स्तरावर, सोमनाथ-काठियावाड हा भाग मराठा सत्तेसाठी पश्चिमेकडील बफर झोन होता. संपूर्ण मराठा इतिहासात गायकवाडांचा स्वतंत्र उल्लेख जरूरी आहे. मूळ महाराष्ट्रातून गेलेले हे बडोद्याचे सरदार गायकवाड यांनी गुजरातच्या काठियावाड परिसरावर दीर्घकाळ राज्य केले. त्यांच्या वतीनेच स्थानिक वतनदार, कारकून, पटेल-पटवारी या यंत्रणेने सोमनाथ व आसपासचा कार्यभार चालवला. सोमनाथचा रोजचा कारभार आणि मोठ्या निर्णयांचे वजनही, मराठा सत्तेच्या कक्षामध्येच राहिले होते. ईस्ट इंडिया कंपनीने १९ व्या शतकात मराठा साम्राज्य मोडीत काढण्यास सुरुवात केली, तेव्हा सोमनाथ परिसरातील देवस्थान जमिनी आणि महसूल हा करारांमधील महत्त्वाचा मुद्दा बनला.
स्वातंत्र्योत्तर भारत अन् ...
स्वातंत्र्यानंतर भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ पुनर्बाधणीचा संकल्प केला. अशा धार्मिक स्मृती जपल्याच पाहिजेत असे त्यांचे आणि के. एम. मुन्शी यांचे आग्रही मत होते. यंदा 'सोमनाथ स्वाभिमान पर्वा'ने याला नवा अर्थ दिला आहे. मोहम्मद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला एक हजार वर्षे पूर्ण होत असताना, देशाने हा प्रसंग अखंड श्रद्धेचा महापर्व म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.
गुजरात सरकार, केंद्र सरकार, अनेक सांस्कृतिक संस्था, साधू-संत, विद्वान, आणि सर्वसामान्य भक्त यांच्या सहभागातून हे स्वाभिमान पर्व आकाराला आले आहे. या पर्वानिमित्त देशभरातून यात्रेचे कार्यक्रम आणि दिल्लीपासून निघालेली स्वाभिमान यात्रा हेच दर्शवते की, सोमनाथ फक्त गुजरातचा विषय नसून तो देशाचा विषय आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग आणि नेतृत्व विशेष उल्लेखनीय आहे.
त्यांनी १०-११ जानेवारीला सोमनाथ येथे पर्वात सहभाग घेतला, स्वाभिमान आणि अखंड श्रद्धा या संकल्पनांना वर्तमान भारताच्या संदर्भात जोडून मांडले. त्यांच्या भाषणांतून आणि उपस्थितीतून एक महत्त्वाचा संदेश गेला आणि तो म्हणजे- सांस्कृतिक स्मृतीचा सन्मान करणे म्हणजे कोणाविरुद्ध द्वेष बाळगणे नाही, उलट, स्वविश्वासाने उभ्या असलेल्या भारताचेच हे लक्षण आहे. म्हणूनच, या पर्वाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करणे म्हणजे एका सरकारचा नव्हे, तर एका दृष्टिकोनाचा गौरव करणे आहे.
'स्वाभिमान पर्व' ही तर जिद्दीची सत्यकथा
'सोमनाथ स्वाभिमान पर्व' हे हिशेब मांडणारे पुस्तक नाही; तो राष्ट्राचा सामूहिक मानस आहे. पुनर्बाधणीची, पुनरुत्थानाची संस्कृती जिवंत ठेवायची असेल, तर सोमनाथची कथा सतत सांगितली गेली पाहिजे.
सोमनाथच्या घंटानादात आजही एकच ध्वनी घुमतो आणि तो म्हणजे आक्रमण होऊ शकतात, सत्ताबदल होऊ शकतात, वाद होऊ शकतात; पण जो समाज आपल्या स्मृतीचा, श्रद्धेचा आणि स्वाभिमानाचा धागा तुटू देत नाही, त्याला इतिहास संपवू शकत नाही.
२०२६ चे स्वाभिमान पर्व ही त्या अढळ सत्याची, हजार वर्षे चाललेल्या भारतीय जिद्दीची सत्यकथा आहे. भारताच्या नेतृत्वाने ती जाणीवपूर्वक, सन्मानाने आणि उत्तरदायित्त्वाने देशासमोर मांडली, यासाठी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करावेच लागेल.