लेख: अश्विनी भिडे यांना अधिकाराची छडी वापरावी लागेल..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:12 IST2026-04-20T11:11:48+5:302026-04-20T11:12:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना मांडली होती. वेगवेगळ्या शहरात त्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली. अनेक वर्षं या स्पर्धेत इंदूर पहिल्या क्रमांकावर येत होते. एमएमआरमधील ९ पैकी नवी मुंबई महापालिका सतत पहिल्या तीनमध्ये येत होती.

लेख: अश्विनी भिडे यांना अधिकाराची छडी वापरावी लागेल..!
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना मांडली होती. वेगवेगळ्या शहरात त्यासाठी स्पर्धा ठेवण्यात आली. अनेक वर्षं या स्पर्धेत इंदूर पहिल्या क्रमांकावर येत होते. एमएमआरमधील ९ पैकी नवी मुंबई महापालिका सतत पहिल्या तीनमध्ये येत होती. २०२४चा निकाल आला तेव्हा नवी मुंबई ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये गेली. याचा अर्थ मुख्य स्पर्धेतून नवी मुंबई महापालिका बाहेर पडली. सुपर लीगमध्ये जी शहरं आहेत, त्यांच्याशी आता नवी मुंबईची स्पर्धा होईल. २०२४च्या मार्चमध्ये भूषण गगराणी यांनी मुंबई महापालिकेची सूत्रं स्वीकारली. त्यावेळी मुंबई शहर या स्पर्धेत १८९व्या क्रमांकावर होते. जगात ओळख असणाऱ्या या शहराची ही प्रतिमा लाजेने मान खाली घालायला लावणारी होती. त्यावेळी मुंबईला ‘भूषण’ वाटेल असे काम करून दाखवा, असा लेख याच जागी लिहिला होता. गगराणी यांनी केलेल्या कामाचा परिणाम दिसला. मुंबईचा क्रमांक १८९ वरून ३३वर आला. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी ‘मेट्रो वुमन’ अशी ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. आपल्याकडे जादूची कांडी नाही. मात्र जी कामे करायची ती दीर्घकालीन परिणाम करणारी करू, अशी भूमिका त्यांच्याशी बोलताना स्पष्ट झाली.
प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेचे आयुक्त का व्हावेसे वाटते? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे. पालिका आयुक्तांकडे बिल्डिंग प्लॅन मंजुरी, बिल्डरांना कन्सेशन देण्याचे अधिकार आहेत. हे अधिकार सर्वसाधारण सभेला किंवा स्टॅण्डिंग कमिटीलाही नाहीत. त्यामुळेच महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात बड्याबड्या बिल्डरांचा राबता असतो. अनेकदा आयुक्त बिल्डरांसोबतच असतात, असा आक्षेपही घेतला जातो. त्या मागची वस्तुस्थिती ही आहे. रिअल इस्टेट व्यवसायात बेंगलोर पहिल्या, तर मुंबई दुसऱ्या नंबरवर आहे. तेव्हा अशा कामाच्या फायली कशा हातावेगळ्या करायच्या याचा आराखडा अश्विनी भिडे यांच्यापुढे आहे. कुठल्याही मोहात पडण्याचा त्यांचा स्वभाव नाही. नियमात बसणारे काम त्यांच्याकडे अडत नाही आणि नियमबाह्य काम त्यांच्या हातून होत नाही, अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे चुकीच्या फायली घेऊन येणारे अश्विनी भिडे यांच्या विरोधात येत्या काळात कुठपर्यंत तक्रारी घेऊन जातील हा वेगळाच विषय आहे.
महापालिका आयुक्त म्हणून आपल्याला काय करायचे आहे हे त्यांना माहिती आहे. ‘स्वच्छ भारत’चे पुढचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. तत्कालीन आयुक्त गगराणी यांनी केलेले काम आणि भिडे करत असलेले काम यातून मुंबई ३३ व्या नंबरवर राहते, की आणखी पुढे जाते हा खरा प्रश्न आहे. ९ मध्ये मुंबई महापालिका खालून तिसरी आहे. भिवंडी, उल्हासनगर खालून पहिल्या दोन क्रमांकात आहेत. या महापालिकांकडे कोट्यवधीचे बजेट आहे. अनेक आश्वासने देत नगरसेवक निवडून आले आहेत. सगळ्यांनी ठरवले तर ९ महापालिका चांगल्या क्रमांकावर येऊ शकतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर आणि विद्यमान आयुक्त कैलास शिंदे यांनी तेथे काय केले म्हणून नवी मुंबई महापालिका सुपर लीगमध्ये गेली हे बाकी महापालिकांनी जरूर बघावे.
अत्यंत बकाल, नशेच्या आहारी गेलेले, वाईट गोष्टींचे केंद्र असलेले सिंगापूर शहर कसे बदलत गेले आणि आजचे सिंगापूर कसे तयार झाले? याचा देखणा प्रवास तेथे म्युझियममध्ये कायमस्वरूपी मांडून ठेवला आहे. मुंबई जगाची आर्थिक राजधानी आपण म्हणतो. पण यात वेळीच लक्ष घातले नाही तर हे शहर कोलकात्यासारखं व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईत आजही जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात. ओला आणि सुका कचरा सोसायट्यांना वेगळा करायला लावला जातो. मात्र नेताना तो एकाच गाडीत मिक्स करून नेला जातो, यासारखी भयंकर गोष्ट दुसरी असू शकत नाही. कुठेही आणि कशाही लोंबणाऱ्या विजेच्या तारा, केबलचे जंजाळ हे नित्याचे आहे. एक किलोमीटर बिना खड्ड्याचा रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी स्पर्धा ठेवली तर महापालिकेचे दिवाळे निघेल इतक्या लोकांना बक्षिसं द्यावी लागतील.
अश्विनी भिडे संयमी, समोरच्याचे म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती असणाऱ्या व काम करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. मुंबईत साहित्य, कला, संस्कृतीसाठी महापालिकेने वेगवेगळी व्यासपीठे तयार करून देण्यापासून रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत इथपर्यंतचे काम त्यांना करून घ्यावे लागणार आहे. मुंबई महापालिकेत काम करणाऱ्यांची कसलीही अकाउंटेबिलिटी नाही. रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडून किंवा टपरीवरून महिन्याला हजार दोन हजार रुपयांचा हप्ता गोळा केला जातो. फुटपाथ महापालिकेचा पण तो अनेक फेरीवाले परस्परच भाड्याने देऊन फुकटचे पैसे कमावतात. तुम्ही कमावता तर आम्हालाही द्या म्हणून पालिकेचे अधिकारी महिन्याला हप्ता वसूल करतात. हे असेच चालू राहिले तर हे शहर कधीही सुधारणार नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत बदल झाला तरच हे होऊ शकेल. यासाठी अश्विनी भिडे यांना जादूची नाही; पण अधिकाराची छडी वापरावी लागेल. नाठाळ कर्मचारी-अधिकाऱ्यांना सरळ करावे लागेल. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनाही भिडे यांना पाठबळ द्यावे लागेल. त्यांना शुभेच्छा.