Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:52 IST2026-04-21T15:51:59+5:302026-04-21T15:52:27+5:30
Lori Deremer Resignation inside story: त्यामुळे महिला मंत्री आणि त्यांच्या विभागातील इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे

Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
Lori Deremer Resignation inside story: अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या कामगार मंत्री सचिव लॉरी चावेझ-डेरेमर यांच्या राजीनाम्यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिका संकटकाळात असताना सरकारी निधीचा वापर करून पूल पार्टी आयोजित केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या चौकशीनंतर, डेरेमर यांनी नैतिक कारणास्तव आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. ट्रम्प मंत्रिमंडळातील सदस्यांचा हा अलीकडील तिसरा राजीनामा आहे. ५८ वर्षीय लॉरी चावेझ यांची ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कामगार मंत्री म्हणून मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली होती. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ५८ वर्षीय लोरी यांनी गैरवर्तणूक चौकशीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विभागातील इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. या सर्वांवर अमेरिकेतील शटडाउन दरम्यान पूल पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.
व्हाइट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग म्हणाले की, डेरेमर यांनी खाजगी क्षेत्रात करिअर करण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ एका वर्षात त्यांनी कामगार क्षेत्रासाठी जे काही केले आहे ते उल्लेखनीय आहे, असेही ते म्हणाले. पण असे असले तरीही या राजीनाम्यामागचे मूळ कारण देश संकटात असताना आणि युद्ध सुरु असताना देशाची महिला मंत्री पूल पार्टी करण्यात व्यस्त होती अशी चर्चा रंगली आहे.
डेरेमर यांनी राजीनामा का दिला?
न्यूयॉर्क पोस्टने एका तक्रारीच्या आधारे डेरेमरबद्दल वृत्त दिले. त्यात असा आरोप करण्यात आला होता की, डेरेमर आपल्या कर्मचाऱ्यांवर ओरडत असे आणि किंचाळत असे. इतकेच नाही, तर ती काम करत असताना मद्यपानही करत असे. डेरेमरवर सरकारी निधी वापरून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना दौऱ्यांवर पाठवल्याचा आरोपही होता, जे बेकायदेशीर होते. डेरेमरवर अधिकाराचा गैरवापर केल्याचाही आरोप होता. त्याच्या सुरक्षा रक्षकांवरही विविध आरोप करण्यात आले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिकन सरकारने शटडाउनची घोषणा केली तेव्हा डेरेमर चर्चेत आल्या. त्या त्यांच्या मित्रांसोबत एका पूल पार्टीला गेल्या, ज्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली.
प्राथमिक चौकशीनंतर राजीनामा
अहवालानुसार, प्राथमिक तपासात असे आढळून आले की, डेरेमर कर्तव्यावर असताना क्लबमध्ये मित्रांसोबत मद्यपान करत होत्या. इतकेच नव्हे तर, त्यांनी सार्वजनिक दौऱ्यांसाठी सरकारी निधीचा वापर केल्याचे आरोपही खरे ठरले. हा तपास अहवाल सिनेटला पाठवण्यात आला, ज्यानंतर डेरेमर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.